भारतातील अन्नपदार्थ सर्वाधिक पर्यावरणपूरक

    14-Oct-2024
Total Views |

Foods in India are the most eco friendly
 (Image Source : Internet/ Representative)
 
 
एबी न्यूज नेटवर्क : 
वर्ल्ड वाईल्डलाईफ फंडच्या लिव्हिंग प्लॅनेट अहवालानुसार, भारतातील अन्नपदार्थ सर्वाधिक पर्यावरणपूरक असल्याचे निष्पन्न झाले आहे. जी-20 अर्थव्यवस्थांमध्ये भारताचे अन्न नमुने सर्वात टिकाऊ म्हणून ओळखले गेले आहेत. भारत जी-20 राष्ट्रांमध्ये शाश्वत अन्न वापरात आघाडीवर आहे. अहवालानुसार, बाकी देशांनी भारताच्या आहाराचा अवलंब केल्यास पर्यावरणाच्या नुकसानात घट होईल आणि 2050 पर्यंत हवामान बदलाचे परिणाम कमी होण्यास मदत होईल.
 
अहवालात असे म्हटले आहे की, 2050 पर्यंत पर्यावरणीय नुकसान कमी करण्यासाठी भारताचा आहार महत्त्वाचा ठरू शकतो. रँकिंगमध्ये भारताच्या खालोखाल इंडोनेशिया आणि चीन आहेत, ज्या देशाचे आहार पर्यावरणासाठी टिकाऊ मानले जातात. दुसरीकडे, युनायटेड स्टेट्स, अर्जेंटिना आणि ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशांमध्ये शाश्वत अन्न वापराच्या पद्धती कमी असल्याचे नमूद केले आहे.
 
अहवालातील एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जागतिक स्तरावर चरबी आणि साखरेचा अतिवापरामुळे लठ्ठपणा वाढत आहे. सध्या, 2.5 अब्जांपेक्षा जास्त प्रौढ व्यक्तींचे वजन जास्त आहे, तर अंदाजे 890 दशलक्ष लोक लठ्ठपणाने ग्रस्त आहेत. भारताची राष्ट्रीय बाजरी मोहीमदेखील अहवालात अधोरेखित करण्यात आली आहे. ही मोहीम प्राचीन धान्यांचा वापर वाढवण्यासाठी सुरु करण्यात आली आहे. भारताच्या विविध खाद्यपदार्थांमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी आहाराचे मिश्रण आहे. उत्तरेकडील भागात मसूर, गहू आणि मांसाचे पदार्थ प्रचलित आहेत, तर दक्षिण भारतात तांदूळ-आधारित पदार्थ जसे की इडली, डोसा यांचा वापर होतो. पश्चिम, पूर्व आणि ईशान्येकडील भागात मासे आणि ज्वारी, बाजरी, नाचणी यांसारख्या धान्यांचा वापर केला जातो.