Blog : महानायकाचा वाढदिवस

11 Oct 2024 11:42:04

Birthday of Hindi cinema legend Amitabh Bachchan
(Image Source : Facebook/Amitabh Bachchan) 
 
 
आज ११ ऑक्टोबर हिंदी चित्रपटसृष्टीचा शहेनशहा, महानायक अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस. ११ ऑक्टोबर १९४२ रोजी उत्तरप्रदेशातील अलाहाबाद येथे जन्मलेल्या अमिताभ यांच्या वडिलांचे (हरिवंशराय बच्चन) मूळ आडनाव श्रीवास्तव असले तरी ते बच्चन या टोपणनावाने कविता प्रसिद्ध करीत त्यामुळे अमिताभ यांनीही चित्रपट सृष्टीत आल्यावर बच्चन हेच टोपणनाव आडनाव म्हणून वापरण्यास सुरुवात केली. पुढे संपूर्ण कुटुंबाचेच बच्चन हेच आडनाव व्यवहारात रूढ झाले.
 
अमिताभ बच्चन यांचे शालेय शिक्षण अलाहाबाद येथील ज्ञानप्रबोधिनी आणि बॉईज हायस्कूल येथे झाले. दिल्लीच्या किरोडीमल महाविद्यालयातून त्यांनी विज्ञानाची पदवी घेतली. त्यानंतर काहीकाळ त्यांनी कोलकाता येथे एका कंपनीत काम केले. पण तिथे त्यांचे मन रमले नाही. तेथून ते मुंबईत आले आणि चित्रपटात कामाच्या संधी शोधू लागले. अमिताभ बच्चन यांना ख्वाजा अहमद अब्बास यांच्या सात हिंदुस्थानी या चित्रपटात संधी मिळाली. दुर्दैवाने हा चित्रपट चालला नाही. अमिताभ यांचाही म्हणावा तसा प्रभाव पडला नाही.
 
अमिताभ बच्चन यांनी हिंदी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले तेव्हा देव आनंद, शम्मी कपूर, राजेश खन्ना, विनोद खन्ना, जितेंद्र, धर्मेंद्र, शशी कपूर अशा देखण्या नायकाची चलती होती. अशा काळात अमिताभ तग धरतील का? अशी साशंकता होती. त्यात त्यांच्या पहिलाच चित्रपट जोरदार आपटला, मात्र त्यांनी हार मानली नाही. सलग सात चित्रपट आपटूनही ते डगमगले नाही. १९७३ साली आलेल्या प्रकाश मेहरा दिग्दर्शित 'जंजीर' या चित्रपटाने अमिताभ यांना खरा ब्रेक मिळवून दिला. या चित्रपटातील पोलीस इन्स्पेक्टरची त्यांची भूमिका खूप गाजली. या चित्रपटानंतर त्यांची अँग्री यंग मॅन अशी जनमानसात प्रतिमा निर्माण झाली. प्रचलित समाजव्यवस्थेच्या विरोधात बंडखोरी व क्रोध व्यक्त करणाऱ्या युवकांचे प्रतिनिधित्व त्यांनी पडद्यावर साकारले. त्यामुळेच त्यांच्या भूमिका प्रेक्षकांना आपल्याशा वाटल्या. उंच शरीरयष्टी, भेदक डोळे, भारदस्त आवाज आणि अनोखी अभिनय शैली यामुळे त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. ते लवकरच सुपरस्टार पदावर पोहचले.
 
दिग्दर्शक ऋषिकेश मुखर्जी यांच्या आनंद चित्रपटात त्यांना सुपरस्टार राजेश खन्ना यांच्यासमवेत काम करण्याची संधी मिळाली. या संधीचे त्यांनी सोने केले. त्यावर्षीचा सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार त्यांना मिळाला. नमक हराम या चित्रपटातील त्यांची भूमिकाही लक्षवेधी ठरली. ७० आणि ८० चे दशक अमिताभ बच्चन यांनी अक्षरशः गाजवून सोडले. दिवार, शोले, अभिमान, कभी कभी, अमर अकबर अँथनी, मुक्कदर का सिकंदर, त्रिशूल, डॉन, काला पथर, नशीब, लावरीस, सिलसिला, नमक हलाल, कुली, शराबी, खुद्दार, अग्निपथ असे एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट त्यांनी दिले. अमिताभ बच्चन यांच्या इतकी लोकप्रियता आजतागायत कोणत्याही अभिनेत्याला लाभलेली नाही.
 
अमिताभ बच्चन हे त्यांच्या काळातील सर्वाधिक मानधन घेणारे अभिनेते होते. त्यांनी आजवर २०० हून अधिक चित्रपटात भूमिका केल्या. त्यांनी काही चित्रपटात पार्श्वगायनही केले. मिस्टर नटवरलाल चित्रपटातील पार्श्वगायनासाठी त्यांना फिल्मफेअरचा पुरस्कारही मिळाला होता. १९८४ साली त्यांनी राजकारणात प्रवेश केला मात्र हा आपला प्रांत नाही हे लक्षात येताच त्यांनी राजकारणाला रामराम केला. १९८२ साली कुली चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी अपघात होऊनही करोडो चाहत्यांच्या आशीर्वादाने अमिताभ पुन्हा एकदा उभे राहिले. १९९६ साली अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन लिमिटेड ही कंपनी त्यांनी स्थापन केली. मात्र लवकरच त्यांना ती बंद करावी लागली. या दरम्यान त्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले. हे आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी त्यांनी दूरचित्रवाणीवरील कौन बनेगा करोडपती या मालिकेचे सूत्रसंचालन करण्यास सुरुवात केली. कौन बनेगा करोडपती ही प्रश्नमंजुषा देखील त्यानी यशस्वी केली.
 
आज ते वयाची ८२ वर्ष पूर्ण करत असले तरी तरुणांना लाजवेल असा त्यांचा उत्साह आहे. अमिताभ बच्चन यांच्यासारखा प्रतिभावान कलाकार युगातून एकदाच जन्माला येतो. त्यांच्यासारखा अभिनेता भारतातच नव्हे, तर जगात झाला नाही आणि पुढे देखील होणार नाही. अमिताभ बच्चन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतानाच त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो. अमिताभ बच्चन यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
 
 
श्याम बसप्पा ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५

 
*Disclaimer : ब्लॉग हे स्वतंत्र व्यासपीठ आहे. त्यामुळे यात मांडले गेलेले विचार हे लेखकाचे आहेत.
Powered By Sangraha 9.0