तारीख ठरली.. 13 जानेवारीपासून नागपुरात तीन दिवस ‘जाणता राजा’ महानाट्य

06 Jan 2024 11:14:51
 
 janata raja mahanatya in nagpur
(image source: internet/representative)  
 
नागपूर :
शिवछत्रपतींच्या जन्मापासून राज्याभिषेकापर्यंतच्या रोमांचकारी प्रसंगांना साकारणारे आशिया खंडातील सर्वात मोठे महानाट्य 'जाणता राजा ' नागपूरकरांच्या भेटीला येत आहे. राज्याचा सांस्कृतिक विभाग, जिल्हा व महानगरपालिका प्रशासनामार्फत या महानाट्याचे आयोजन करण्यात आले असून 13, 14, व 15 जानेवारी रोजी यशवंत स्टेडियमवर प्रयोग होणार आहेत.
 
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात आणि 350 व्या राज्य शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त प्रत्येक जिल्ह्यात महानाट्याचे सादरीकरण करण्याचे राज्य शासनाने ठरवले आहे. या उपक्रमातील पहिला राज्यव्यापी प्रयोग नागपूर येथे होत आहे.
 
जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये छत्रपती सभागृहात या संदर्भात आढावा बैठक घेण्यात आला. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 350 व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त राज्यभर होणाऱ्या महानाट्याची सुरुवात नागपुरातून व्हावी, अशी सूचना जिल्हा प्रशासनाला केली आहे. आमदार प्रवीण दटके, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, सांस्कृतिक कार्य विभागाचे अधिकारी तसेच महानगरपालिका व जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आज या संदर्भात नियोजनाची बैठक झाली.
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार इतिहासकार शिवशाहिर पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांनी लिखित व दिग्दर्शित केलेला हा प्रयोग यशवंत स्टेडियमवर 30 हजारापेक्षा जास्त प्रेक्षकांच्या साक्षीने फिरत्या रंगमंचावर रंगणार आहे.यासाठी प्रवेशिका असेल, मात्र प्रवेश मोफत ठेवण्यात आला आहे.
 
दररोज सायंकाळी साडेपाच वाजता नंतर या प्रयोगाला सुरुवात होईल. उंट ,घोडे यांचा वापर आणि शिवरायांच्या काळातील सर्व रोमांचक घटनाक्रमाचे जिवंत चित्रण 200 च्या वर कलाकार करणार आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0