मोर्शी :
अमरावती जिल्ह्यातील वरदान असणाऱ्या सर्वात मोठ्या अशा अप्पर वर्धा धरण जलाशयावर दरवर्षी हिवाळ्यामध्ये विविध प्रजातीचे परदेशी पक्षी स्थलांतर करून येतात. नुकताच मोर्शी येथील आर.आर.लाहोटी विज्ञान महाविद्यालयाचे प्रा.अश्विन लुंगे यांना पक्षी निरीक्षण करीत असतांना वेगळ्या प्रकारचा चिखलपक्षी आढळून आला. तो पक्षी सोन चिखल्या (पॅसिफिक गोल्डन प्लोव्हर) असल्याचा दुजोरा अमरावतीच्या श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाचे प्राध्यापक तसेच वरिष्ठ पक्षी अभ्यासक डॉ. गजानन वाघ यांनी दिला. दुर्मिळ अश्या 'सोन चिखल्या' या स्थलांतरित पक्षाची या अगोदर अमरावतीच्या काही जलाशयावर याची नोंद करण्यात आली होती. मात्र या जलाशयावरची ही पहिलीच नोंद आहे.
सोन चिखल्या हा एक स्थलांतरित किनारा पक्षी आहे. हे पक्षी सायबेरिया, कझाकिस्तान वरून चार ते पाच हजार किलोमीटरचा प्रवास करून ते आपल्या भागामध्ये हिवाळी पाहुणे म्हणून दाखल होतात. हा पक्षी वरून उदी रंगाचा असतो. त्यावर सोनेरी व पिवळ्या रंगाचे ठिपके व छातीवर बदामी करडा रंग असतो. या पक्षांच्या पंखांना सोनेरी छटा असतात. हा पक्षी दुर्मिळ असून सहजपणे आपल्या भागामध्ये आढळत नाही. सामान्यता हा पक्षी पाणथळ व दलदलीच्या ठिकाणी आढळतो. हा पक्षी पाण्यातील किडे, कृमी, गांडूळ व कोळी खातो. सायबेरिया, अलास्का, कझाकिस्तान मध्ये यांची विण होते. हिवाळी स्थलांतरादरम्यान हे पक्षी सातपुडा पर्वत रांगेनंतर दक्षिण भारतात जात असतांना या जलाशयाचा महत्त्वाचा थांबा म्हणून वापर करतात. अप्पर वर्धा जलाशय हे अनेक हिवाळी स्थलांतरित बदक, हंस व विविध चिखल पक्षांच्या दृष्टीने एक महत्त्वाची पाणथळ परिसंस्था आहे. हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे असे प्रा. डॉ. गजानन वाघ यांनी सांगितले.