RTMNU फुटबॉल संघ ठरला ऑल इंडिया विद्यापीठ स्पर्धेसाठी पात्र

03 Jan 2024 12:00:56

rtmnu football team
 
 
नागपूर :
मुंबई येथील एचएसएनसी विद्यापीठाच्या यजमान पदाखाली घेण्यात आलेल्या पुरुष गटाच्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ फुटबॉल स्पर्धेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या संघाने (RTMNU Football Team) धडाकेबाज कामगिरी करीत पश्चिम विभागीय फुटबॉल स्पर्धेतील चॅम्पियनशिप आपल्या नावे केली आहे. याच कामगिरीच्या जोरावर विद्यापीठाचा फुटबॉल संघ अखिल भारतीय आंतरविद्यापीठ फुटबॉल स्पर्धेसाठी पात्र ठरला असल्याची माहिती विद्यापीठ क्रीडा विभागाचे संचालक डॉ. शरद सुर्यवंशी यांनी दिली.
 
स्पर्धेत जेतेपदासाठी झालेल्या लढतीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या संघाने यजमान मुंबईला ५-४ अशा गोलने मात देत जेतेपद पटकावले. तत्पूर्वी झालेल्या सामन्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ पुरुष संघाने पहिल्याच लढतीत विजय नोंदवित दमदार सुरुवात केली होती. या लढतीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ संघाने गुजरातच्या सरदार पटेल विद्यापीठाचा ३-१ ने पराभव करीत विजयी सुरुवात केली. विजयी संघाच्या मो. ओविस अशरफने दोन तर बादल सोरेनने एक गोल केला.
 
दुसऱ्या सामन्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ संघाला प्रतिस्पर्धी संघ हजर न झाल्याने पुढे चाल देण्यात आली. तिसऱ्या लढतीत नागपूर संघाने पुण्याच्या डी.वाय. पाटील विद्यापीठाचा ९-० अशा गोलने धुव्वा उडवित विजयी आगेकूच स्पर्धेत कायम ठेवली. स्पर्धेत विजयी संघाच्या मो. ओविस अशरफ, आयुष केसरी, मो. हंझालाने प्रत्येकी दोन गोल तर प्रीत कनोजिया, सुब्रतो दीपदास व बादल सोरेनने प्रत्येकी एक गोल करीत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले.
 
चौथ्या लढतीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ संघाने गोव्याला टायब्रेकरमध्ये ४-२ अशा गोलने नमविले. या सामन्यात निर्धारित वेळेत दोन्ही संघाने प्रत्येकी दोन गोल नोंदविले. त्यामुळे सामन्याचा निकाल टायब्रेकरने लावण्यात आला. टायब्रेकरमध्ये ४-२ अशा गोलने नागपूर संघ विजयी ठरला. याच कामगिरीच्या जोरावर नागपूर विद्यापीठाचा फुटबॉल संघ पंजाब येथे होणाऱ्या अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. प्रशिक्षक फ्रान्सिस डेव्हिड आणि संघव्यवस्थापक राॅड्रिक्स अँथोनी यांच्या मार्गदर्शनात या संघाने हे यश प्राप्त केले.
 
विद्यापीठाच्या फुटबॉल संघाच्या कामगिरीबद्दल राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. शरद सुर्यवंशी यांनी समाधान व्यक्त केले आहे. तर विद्यापीठ संघाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, प्र-कुलगुरु डॉ. संजय दुधे, कुलसचिव डॉ. राजू हिवसे यांनी अभिनंदन करीत पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
 
विद्यापीठाचा विजयी संघ -
मिशकत अहम, निजेल झेव्हियर, प्रीत कनोजिया, मो. अकदास, मो. असद, मो. मोईज अकमल, आयुष केसरी, मो. हंजाला, बादल सोरेन, मो. अशरफ, शुब्रदीप दास, तेजस चाफले, एच. राजा, गौरव सायरे, अमोल मदनकर, एस. अंसारी, जमीर शेख, रंजोय बानिक, अमन तुटी, मो. नोमन. राखीव खेळाडू- अ‍ॅलेक्स टोपो, मो. नासीर, अनुराग चांदे, चेतन राउत, मोइन बेग, प्रियांशी शर्मा, संविधान दहिवले, इमॅनूएल, निखिलेश पेढेकर, तन्मय खांदे, गीत हिरनखेडे, आदित्य नेवारे.
Powered By Sangraha 9.0