भारतातच नव्हे तर जगभरात झाला 'जय श्रीराम'चा जयघोष

    22-Jan-2024
Total Views |
 
ram mandir pranpratistha ceremony was celebrated all over world
 
 
नवी दिल्ली :
अयोध्येत राम मंदिरात प्रभू श्रीरामाच्या बालस्वरूप मूर्तीची प्राणप्रतिष्ठा संपन्न झाली आहे. यानिमित्त संपूर्ण देशभरात मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. दिवाळी प्रमाणे हा उत्सव साजरा करण्यात येत आहे. संपूर्ण देशाने जणू भगव्या रंगाची चादर ओढली आहे. केवळ देशातच नव्हे तर विदेशात देखील श्रीरामाचा उत्सव साजरा करण्यात आला आहे. कुठे ३D फोटो लावण्यात आले तर कुठे पहिले राम मंदिर स्थापित करण्यात आले असून काही ठिकाणी कार रॅली काढण्यात आली. भारताबरोबरच विदेशातही 'जय श्री राम'च्या जयघोषाने वातावरण राममय झाले आहे.
 
अयोध्येत होणाऱ्या श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठेनिमित्त ब्रिटनमध्ये आस्था कलश यात्रा काढण्यात आली. अखंड रामायण पाठ देखील करण्यात आले. आनंद व्यक्त करत मिठाई देखील वाटण्यात आली. मॉरिशसमध्ये रस्त्यांना सजविण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियामध्ये देखील मोठी शोभायात्रा काढण्यात आली.
 
 
अमेरिकेत राम नामाच्या जयघोषात निघाली कार रॅली
अमेरिकेतील वैष्णव हिंदू परिषदेद्वारे गोल्डन गेट ब्रिजवर भव्य कार रॅली काढण्यात आली. रामभक्तांद्वारे रविवारी भर पाऊस आणि थंडीत देखील कार रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत 'जय श्री राम'चा जयघोष करत १००० कार, ५० पेक्षा अधिक बाईक, ३ बस आणि २००० पेक्षा जास्त रामभक्तांचा समावेश होता. अमेरिकेच्या न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअर, वाशिंग्टन, डीसी, एलए, सैन फ्रान्सिस्कोबरोबर इतरही काही भागांत मोठा उत्सव साजरा करण्यात आला.
 
 
मॉरिशसच्या पंतप्रधानांनी जनतेला केले आवाहन
या ऐतिहासिक दिनानिमित्त मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जुगनाथ यांनी देशातील जनतेला उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले. सोशल मीडियाद्वारे अयोध्येत झालेल्या प्राणप्रतिष्ठा समारोहाबद्दल त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहे.
 
 
मेक्सिकोत पहिल्या राम मंदिराची स्थापना
अयोध्येत पार पडलेल्या राम मंदिरातील राम मूर्ती प्राणप्रतिष्ठानिमित्त मेक्सिकोतील भारतीय दूतावासाने देखील राम मंदिराची उभारणी केली असल्याची माहिती दिली आहे. मेक्सिकोतील रामाचे हे पहिले मंदिर आहे. रविवारी संध्याकाळी मेक्सिकोतील क्वेरेटारो शहरात हे मंदिर तयार करण्यात आले आहे. या मंदिराची अमेरिकन पुजाऱ्याच्या हस्ते पूजा आणि अभिषेक करून विधिवत स्थापना करण्यात आली. दरम्यान भजन-कीर्तनामुळे रामभक्तीमय वातावरण तयार झाले होते. याच शहरात मेक्सिकोतील पहिले हनुमानाचे मंदिर देखील स्थित आहे.