पंतप्रधान मोदी १४ सप्टेंबर रोजी छत्तीसगड दौऱ्यावर येणार

    06-Sep-2023
Total Views |
  • रायगडमधील जाहीर सभेला संबोधित करण्याची शक्यता
modi-to-visit-chhattisgarh-on-september-14th-raigad-public-rally - Abhijeet Bharat 
रायपूर : आगामी छत्तीसगड विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील सत्ताधारी पक्ष आणि भाजपकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. पक्षाच्या प्रचार प्रसारासाठी विरोधी पक्ष आणि सत्ताधारी आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत. अनेक दिग्गज नेते छत्तीसगड राज्याच्या दौऱ्यावर येत असून अनेक जाहीर सभा देखील घेण्यात येत आहे. अशातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा छत्तीसगड राज्याच्या दौऱ्यावर येणार असल्याची बातमी समोर आली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी १४ सप्टेंबर रोजी एक दिवसीय छत्तीसगड दौऱ्यावर येणार आहेत. दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास ते छत्तीसगडमधील रायगड पोहोचतील. त्यानंतर पंतप्रधान मोदी रायगड जिल्ह्यातील कोडातराई गावात एका जाहीर सभेला संबोधित करण्याची शक्यता आहे. जाहीर सभेला संबोधित करण्यापूर्वी पंतप्रधान मोदी एसईसीएल, रेल्वे, एनटीपीसीच्या प्रकल्पांची पायाभरणी करतील. पायाभरणी केल्यानंतर जाहीर सभेला संबोधित करून ४.४५ वाजताच्या दरम्यान पंतप्रधान मोदी रवाना होतील.
 
यापूर्वी पंतप्रधान मोदी ७ जुलै रोजी छत्तीसगड दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी राज्याची राजधानी रायपूर येथे सुमारे ७५०० कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी तसेच लोकार्पण केले. त्यामुळे पंतप्रधान मोदींचा छत्तीसगड राज्याच्या हा दुसरा दौरा असणार आहे. दरम्यान, २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला काँग्रेसकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे यावर्षी भाजपने आपली कंबर कसली आहे. छत्तीसगडमधील १२ सप्टेंबर रोजी दंतेवाडा येथून सुरु होणाऱ्या पहिल्या परिवर्तन यात्रेला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे. तर १६ सप्टेंबर रोजी जशपूरनगर येथून सुरू होणाऱ्या परिवर्तन यात्रेला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा जशपूरनगरला उपस्थित राहतील.