नवी दिल्ली : वर्ल्ड कप 2023 साठी मंगळवारी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी आज पत्रकार परिषद घेऊन विश्वचषक 2023 साठी १५ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली. आशिया चषक 2023 मध्ये आधीच उपस्थित असलेल्या बहुतांश खेळाडूंची या १५ सदस्यीय संघात निवड करण्यात आली आहे. युवा फलंदाज तिलक वर्मा आणि वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा यांना विश्वचषक संघातून वगळण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर स्टार लेगस्पिनर युजवेंद्र चहलचेही नाव विश्वचषक २०२३ साठी निवडण्यात आलेल्या संघात नाही.
विश्वचषक 2023 साठी निवडण्यात आलेल्या संघात भारताच्या तीन स्टार खेळाडूंना स्थान मिळालेले नाही. आयसीसी टूर्नामेंटमध्ये टीम इंडियाला अनेक सामने जिंकून देणारा दमदार सलामीवीर शिखर धवनकडे निवड समितीने दुर्लक्ष केले आहे. शिखर बराच काळ संघाबाहेर असला तरी डावखुऱ्या फलंदाजाचा वनडेत चांगला रेकॉर्ड आहे. तसेच युजवेंद्र चहलला आशिया कप संघातही स्थान मिळाले नाही. उजव्या हाताचा फिरकी गोलंदाज टी-20 मध्ये भारतासाठी सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. एकदिवसीय सामन्यातील त्याचा विक्रमही भक्कम आहे. मात्र, संघात दोन लेगस्पिनर ठेवणे आवश्यक नाही आणि सध्या कुलदीप यादव चमकदार कामगिरी करत आहे, असे यावेळी रोहित शर्मा आणि अजित आगरकर म्हणाले.
तसेच आशिया कप 2023 मध्ये बॅकअप म्हणून टीम इंडियामध्ये सामील झालेल्या संजू सॅमसनला विश्वचषक 2023 च्या संघात स्थान देण्यात आलेले नाही. निवड समितीने केएल राहुल आणि इशान किशन यांची यष्टिरक्षक म्हणून निवड करण्याचा निर्णय घेतला आहे.
भारत-पाकिस्तान सामन्याबद्दल भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा म्हणाल, मी हे अनेकवेळा सांगितले आहे, बाहेर जे काही घडत आहे त्याचा आमच्यावर परिणाम होत नाही. आमचे काम बाहेरचे वातावरण पाहणे आणि त्यानुसार खेळणे नाही. संघातील सर्व खेळाडू अनुभवी आहेत.
विश्वचषक २०२३ साठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, शुभमन गिल, जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, ईशान किशन, सूर्यकुमार यादव.