वाडी पोलिसांची कामगिरी; मोटार सायकली चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला अटक

    05-Sep-2023
Total Views |
  • २३ लाख ५ हजाराचा मुद्देमाल जप्त
wadi-police-operation-international-motorcycle-theft-gang-arrest - Abhijeet Bharat
 
वाडी : दुचाकी चोरांच्या टोळीला जेरबंद करण्यात वाडी पोलिसांना यश आले आहे. अटक करण्यात आलेल्या चोरट्यांकडून चोरीच्या दुचाकीही जप्त करण्यात आल्या आहेत. यामध्ये वाडी पोलिसांनी मध्यप्रदेश राज्यातील शिवनी जिल्ह्यातून ३ चोरट्यांना अटक केली असून त्यांच्याकडून २३ लाख ५ हजार रुपये किमतीच्या ३१ दुचाकी व एका कार जप्त करण्यात आल्याची माहिती वाडीचे ठाणेदार प्रदीप रायन्नावर यांनी दिली.
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर शहरातील वाडी पोलिस ठाणे हद्दीतील आठवा मैल आठवडी बाजारातून तसेच इतर ठिकाणाहून सातत्याने दुचाकी व चारचाकी वाहनांची चोरी होत असल्याने ठाणेदार प्रदीप रायन्नावर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन वाडीचे तपास पथक गेल्या २ महिन्यांपासून वाहन चोरीच्या गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सतत कार्यरत होते. आरोपींचा शोध सुरू असताना वाडी पोलीस ठाण्याचे पीएसआय गणेश मुंढे, एचसी प्रमोद गिरी, प्रवीण फलके, प्रमोद सोनोने, सतीश येसनकर, हेमराज बेरळ यांना वाडी व नागपूर शहरातून चोरलेल्या दुचाकी मोटारसायकल मध्य प्रदेशात जात असल्याची माहिती मिळाली.
 
गुप्त माहिती आणि तांत्रिक सहाय्याच्या मदतीने आरोपींची ओळख पटवली. या आरोपीने जिल्हा सिवनी राज्य मध्य प्रदेशात आपले अस्तित्व लपवत असल्याची माहिती मिळताच वाडी पोलीस स्टेशनचे पथक सिवनी जिल्ह्याकडे रवाना झाले. हे पथक दोन दिवसांपासून आरोपीच्या शोधात सापळा रचत होते. तांत्रिक व गुप्त बातमीदाराची माहिती मिळाल्यानंतर खात्री झाली की ३१ ऑगस्ट रोजी मानेगाव येथे पीएसआय गणेश मुंढे व पथकाने आरोपी शैलेंद्र सुरजप्रसाद नायक (वय २७ वर्ष रा. मानेगाव), आरोपी राजेश छत्रपाल भलावी (वय २७ वर्ष रा. मानेगाव), आरोपी मनेश उर्फ बंटी राजकुमार बिसेन (वय २३ वर्ष रा. जनता नगर पोस्ट बोर्डाई) यांना ताब्यात घेण्यात आले.
 
आरोपींकडून आतापर्यंत एकूण ३१ मोटार सायकल आणि एक चारचाकी टाटा इंट्रा जप्त करण्यात आली आहे. यामध्ये गिट्टीखदान पोलिस ठाण्याच्या दोन दुचाकी, यशोधरा पोलिस ठाण्याच्या एक दुचाकी आणि कामठी पोलिस ठाण्याच्या एक दुचाकीचा समावेश आहे. याशिवाय आरोपींकडून आणखी घटना उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे. आरोपी हे प्रामुख्याने आठवा मैल आठवडी बाजारातून मोटारसायकल चोरायचे. ही कारवाई उपायुक्त अनुराग जैन, एसीपी प्रवीण तेजाळे, पीआय प्रदीप रायण्णावर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय गणेश मुंढे, एचसी प्रमोद गिरी, प्रवीण फलके, प्रमोद सोनोने, सतीश येसनकर, हेमराज बेराळ यांनी केली आहे.