ब्राझीलिया : ब्राझील येथे उष्णकटिबंधीय चक्रीवादळाने हाहाकार माजवला आहे. ब्राझीलच्या दक्षिणेकडील रिओ ग्रांदे डो सुल राज्यात उष्णकटिबंधीय चक्रीवादळ आल्याने मोठे नुकसान झाले आहे. या चक्रीवादळामुळे झालेल्या पूर आणि भूस्खलनात किमान ४ जणांचा मृत्यू झाला आहे. येथील स्थानिक अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे.
चक्रीवादळामुळे आलेल्या पुरामुळे येथील एका घरात पाणी शिरले, त्यामुळे सोमवारी पाण्यात करंट आल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला. तर पुराच्या पाण्यात कार वाहून गेल्याने आणखी एक तरुण आणि एका जोडप्याचा मृत्यू झाला आहे.
चक्रीवादळामुळे अर्जेंटिना आणि उरुग्वेच्या सीमेला लागून असलेल्या राज्यातील 15 हून अधिक शहरांना पूर आला आहे, अशी माहिती एका वृत्तसंस्थेने दिली आहे. या सर्व पूरग्रस्त राज्यांव्यतिरिक्त राज्याची राजधानी पोर्टो अलेग्रेचाही समावेश आहे.