लंडन येथील गणेशविक्री स्टॉलला उपसभापती डॉ. गोऱ्हे यांची भेट

    04-Sep-2023
Total Views |
  • मराठी तरुणीने लंडन येथे स्टॉल सुरू केल्याबद्दल केले कौतुक
ganesh sale stall in london deputy chairman dr gorhe visit - Abhijeet Bharat
 
लंडन : महाराष्ट्रातील पेण येथील गणपती लंडनमधील भारतीयांसाठी अंजुषा चौगुले यांनी उपलब्ध करून दिले आहेत. यामध्ये बाल गणेशापासून ते सिंहासनावर आसनस्थ असलेले मोठ्या आकाराचे गणपती आहेत. एका मराठी तरुणीने अगदी पेण सारखेच गणेश विक्रीचे मराठीत फलक लावत त्याची सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्धी केलेली असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.
 
 
लंडन येथील वेंबली भागात मराठमोळ्या चौगुले यांनी गणेश विक्री स्टॉल सुरू केला आहे. या स्टॉलला उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी भेट दिली. त्यावेळी त्या बोलत होत्या. कोणाच्याही आहारी न जाता स्वतंत्रपणे हा उपक्रम एका मराठी तरुणीने लंडन येथे सुरू केल्याबद्दल डॉ. गोऱ्हे यांनी चौगुले यांचे कौतुक केले. मुंबईत देखील त्या हेच काम करत असतात त्यांना तिथे देखील संपर्क करता येईल. त्यांच्या या सेवेचा लाभ सर्व गणेशभक्तांनी घ्यावा, असे आवाहन डॉ. गोऱ्हे यांनी केले.
 
चौगुले यांनी ‘विघ्नहर्ता गणेश’ या नावाची संस्था सुरू केली आहे. त्यामार्फत भारत आणि युरोपमध्ये पर्यावरणपूरक गणेश मूर्तींची त्या विक्री करतात. पेण येथील कारागिरांनी पारंपरिक पद्धतीने शाडूच्या मातीपासून बनवलेल्या गणेश मूर्तींचे लंडनमधील हे पहिले पॉप अप स्टोअर ट्रेडर वेम्बली येथे सुरू केले आहे.