- गांधी वाटिकेचेही केले उद्घाटन
नवी दिल्ली : यावेळी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की, महात्मा गांधी हे संपूर्ण जागतिक समुदायासाठी वरदान आहेत. त्यांच्या आदर्श आणि मूल्यांनी संपूर्ण जगाला नवी दिशा दिली आहे. महायुद्धांच्या काळात जग विविध प्रकारच्या द्वेष आणि कलहाने ग्रासले होते, त्या काळात त्यांनी अहिंसेचा मार्ग दाखवला, असे प्रतिपादन आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले. राष्ट्रपतींच्या हस्ते आज 4 सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथील गांधी दर्शन येथे महात्मा गांधींच्या 12 फूट उंच पुतळ्याचे अनावरण केले तसेच ‘गांधी वाटिका’ चे उद्घाटन केले. यावेळी त्या बोलत होत्या.
राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या, गांधीजींच्या सत्य आणि अहिंसेच्या प्रयोगाने त्यांना महान मानवाचा दर्जा दिला. अनेक देशांमध्ये त्यांचे पुतळे उभारण्यात आले आहेत आणि जगभरातील लोकांचा त्यांच्या आदर्शांवर विश्वास आहे. नेल्सन मंडेला, मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर आणि बराक ओबामा यांची उदाहरणे देत त्या म्हणाल्या की, अनेक महान नेत्यांनी गांधीजींनी दाखवलेला सत्य आणि अहिंसेचा मार्ग जागतिक कल्याणाचा मार्ग मानला. त्यांनी दाखविलेल्या मार्गावर वाटचाल केल्यास जागतिक शांततेचे उद्दिष्ट गाठता येईल, यावर त्यांनी भर दिला.
गांधीजींनी सार्वजनिक तसेच वैयक्तिक जीवनातही पावित्र्यावर भर दिला. नैतिक बळाच्या जोरावरच अहिंसेच्या माध्यमातून हिंसेला सामोरे जाता येते, यावर त्यांचा विश्वास होता असे राष्ट्रपती म्हणाल्या. आत्मविश्वासाशिवाय कोणतीही व्यक्ती प्रतिकूल परिस्थितीत संयमाने वागू शकत नाही असे त्यांनी अधोरेखित केले. आजच्या वेगाने बदलणाऱ्या आणि स्पर्धात्मक जगात आत्मविश्वास आणि संयमाची नितांत गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
गांधीजींचे आदर्श आणि मूल्ये आपल्या देशासाठी आणि समाजासाठी आजही अतिशय प्रासंगिक आहेत असे राष्ट्रपती म्हणाल्या. प्रत्येक नागरिकाने, विशेषत: युवकांनी आणि मुलांनी गांधीजींबद्दल जास्तीत जास्त वाचन करून त्यांचे विचार आत्मसात करावेत आणि यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी केले. या संदर्भात गांधी स्मृती आणि दर्शन समिती तसेच अशा विविध संस्थांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते असे त्यांनी सांगितले. त्या म्हणाल्या की, गांधीजींच्या स्वप्नांमधील भारत साकारण्यासाठी युवकांना आणि मुलांना पुस्तके, चित्रपट, चर्चासत्र आणि इतर माध्यमांतून गांधीजींचे जीवन आणि विचारांबद्दल अधिकाधिक अवगत करून मोलाचे योगदान देता येईल.