चीनचा खोडसाळपणा

    03-Sep-2023
Total Views |

China mischief - Abhijeet Bharat 
भारताचा शेजारी असणारा पण भारताला कायम पाण्यात पाहणारा चीन सतत काही ना काही खोड्या काढून दोन्ही देशातील तणाव कायम वाढवत असतो. हे आताच नाही तर १९६२ पासून चालू आहे. १९६२ साली भारताशी मैत्रीचा हात पुढे करून हिंदी चिनी भाई भाई म्हणत त्याने भारताचा केसाने गळा कापला. त्यानंतरही त्याने भारताच्या सतत खोड्या काढून भारताला त्रास दिला. कधी त्याने भारतात घुसखोरी केली तर कधी त्याने सीमेवर नवीन गावे वसवली, तर कधी भारतातील गावांना चिनी नावे देऊन ती गावे चीनच्या हद्दीत असल्याचा दावा केला. अर्थात चीनच्या या दाव्याला किंवा खोडसाळपणाला भारताने कधी भीक घातली नाही. तरीही त्यांचा खोडसाळपणा कमी झाला नाही, उलट वाढतच गेला.
 
आता पुन्हा त्याने भारताची अशीच खोडी काढून खोडसाळपणा केला आहे. यावेळी चीनने भारतातील लडाख आणि अरुणाचल प्रदेशातील काही गावांना चीनच्या नकाशात दाखवले आहे. जी २० शिखर संमेलनात चीनने त्यांचा नवीन नकाशा जाहीर केला. हा नवीन नकाशा नुकताच इंटरनेटवर प्रसिद्ध झाला. या नकाशात त्याने भारतातील लडाख आणि अरुणाचल प्रदेशातील काही गावांना चीनमध्ये दाखवले. इतकेच नाही तर त्या गावांना चिनी नावे देखील दिली आहेत. चीनच्या या खोडसाळपणाची भारताने तातडीने दखल घेऊन त्याचा निषेध केला आहे. अर्थात केवळ चीनचा निषेध करून चीन आपल्या या खोड्या बंद करणार नाही. कारण दुसऱ्यांच्या खोड्या काढून गंमत पाहण्याची चीनची जुनी खोड आहे. अशी खोड तो फक्त भारताचीच काढतो असे नाही, तर इतर देशांचीही काढतो. मात्र आशिया खंडातील विशेषतः भारताच्या शेजारील काही देशांना त्याने वारेमाप कर्ज देऊन तर काही देशांना धाक दाखवून गप्प बसवले आहे. भारत मात्र त्याच्या या खेळीला बळी पडत नाही म्हणूनच तो अशा खोड्या अधून मधून काढत असतो.
 
भारताच्या अरुणाचल प्रदेश आणि लडाखवर चीनचा डोळा आहे. इतकेच नाही तर अरुणाचल प्रदेश हा आपलाच भूभाग असल्याचा दावा चीनने अनेकदा केला आहे. काही महिन्यांपूर्वी चीनच्या झाऊझंग येथे पार पडलेल्या क्रीडा स्पर्धेत भारताने खेळण्यास नकार दिला. त्यावेळी चीनने अरुणाचल प्रदेशातील खेळाडूंना स्टेपल व्हिसा दिला होता. स्टेपल व्हिसा देऊन त्यांनी एकप्रकारे भारताला डिवचले होते. त्या आधी लडाखमध्ये चिनी सैन्य घुसवले होते, तेव्हा दोन्ही देशातील सैन्य एकमेकांपुढे उभे ठाकले होते. केव्हाही युद्धास तोंड फुटेल अशी परिस्थिती निर्माण झाली होती. यावेळी झालेल्या धुमश्चक्री नंतर चिनी सैन्य भारताच्या हद्दीतून निघून गेले होते. मात्र सीमेवर त्यांच्या हालचाली कायम चालू असतात.
 
मुळात चीन हा जगातला सर्वात कपटी देश आहे. चीनला जगातील महासत्ता व्हायचं आहे त्यासाठी त्याने विस्तारवादी भूमिका स्वीकारली आहे त्यामुळेच तो शेजारील देशांची जमीन आणि मालमत्ता बळकावीत आहे. त्यांच्या या विस्तारवादी धोरणाला जर कोणी आडकाठी आणणार असेल तर तो भारत आहे हे चीन जाणून आहे म्हणूनच तो भारताच्या अशा अधूनमधून खोड्या काढून भारताला त्रास देत असतो अर्थात त्याच्या या खोड्यांना भारत आता बधणार नाही कारण आजचा भारत हा १९६२ चा भारत नसून २०२३ चा भारत आहे. चीनच्या आरे ला कारे करण्याची हिंमत या भारतात आहे त्यामुळेच भारताशी थेट पंगा न घेता अशा छोट्या मोठ्या खोड्या काढून भारताला त्रास देण्याचे धोरण चीनने स्वीकारले आहे.
 
श्याम बसप्पा ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५
 
*Disclaimer : ब्लॉग हे स्वतंत्र व्यासपीठ आहे. त्यामुळे यात मांडले गेलेले विचार हे लेखकाचे आहेत.