Representative Image from Internet
नागपूर : डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, विंग-सी, श्रध्दांनदपेठ, नागपूर येथील सभागृहामध्ये 1ऑक्टोंबरला सकाळी 10.30 वाजता जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी जिल्हाधिकारी, डॉ. विपीन इटनकर हे उद्घाटक म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून सार्वजनिक पदयात्रा, प्रभात फेऱ्या, सभा, विशेष कार्य केलेल्या ज्येष्ठांचा व ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करणाऱ्या बिगर सरकारी संस्थांचा सत्कार, गौरव, आरोग्य शिबीर, चर्चासत्र व परिसंवाद आदी कार्यक्रमाचे आयोजन तसेच या कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी कायदे व योजना विषयक बाबीची माहिती, वृध्दांचे हक्क, ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणाऱ्या सोयीसुविधा, ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन इत्यादीबाबत मार्गदर्शनसुध्दा करण्यात येणार आहे.
ज्येष्ठ नागरिक सुस्थितीत असावा, अशी तरतूद आहे. ज्येष्ठ नागरिकांचे समाजातील स्थान विचारात घेता त्यांना वृध्दापकाळ चांगल्या तऱ्हेने घालविता यावा. समाजामध्ये त्यांचे जिवन सुसहय व्हावे, शारिरिक व मानसिक आरोग्य सुस्थितीत राहावे, वृध्दापकाळमध्ये त्यांच्या आर्थिक क्षमता, कामाचा हक्क आणि सार्वजनिक मदत मिळण्यासाठी राज्याचे सर्वसमावेशक धोरण सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णयान्वये निर्गमित करण्यात आले आहे. त्यानुषंगाने 1 ऑक्टोबर हा दिवस राज्यात "जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस साजरा करण्यात येतो.
या कार्यक्रमाचे आयोजन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नागपूर या कार्यालयाच्या वतीने करण्यात येणार असून उपायुक्त तथा सदस्य, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती सुरेंद्र पवार, समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिध्दार्थ गायकवाड, सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी किशोर भोयर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच नागपूर जिल्हयातील सर्व ज्येष्ठ नागरिक कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.