नागपूर : नागपूर शहरात मुसळधार पावसामुळे अनेक भागात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. अनेक भागातील घरे पाण्याखाली आल्याने सामानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सर्वच भागातील पाणी ओसरल्याने खराब सामानाची विल्हेवाट लावण्याचा अनेकांपुढे प्रश्न निर्माण झालेला आहे. या समस्येवर पुढाकार घेत नागपूर महानगरपालिकेद्वारे 9823245671 हा विशेष मदत क्रमांक जारी करण्यात आलेला आहे.
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी सोमवारी २५ सप्टेंबर रोजी सकाळी पूरग्रस्त भागात जाऊन झालेल्या नुकसानाची पाहणी केली. यावेळी नागरिकांमार्फत पावसामुळे खराब झालेल्या सामानाची विल्हेवाट लावण्याची समस्या मांडण्यात आली. यावर आयुक्तांनी पुढाकार घेत मदत क्रमांक जारी केला. मनपाच्या 9823245671 या क्रमांकावर संपर्क साधून माहिती दिल्यास मनपाची चमू संबंधित व्यक्तीच्या घरी येऊन खराब सामान घेऊन जात आहेत. मनपा आयुक्तांनी सुरू केलेल्या या मदत क्रमांकामुळे अनेक नागरिकांना दिलासा मिळाला आहे.