- बारा फुटाचा नाला झाला चार फुटाचा अतिक्रमण सर्वात मोठी चिंता
- पायल्याचा व्यास वाढविणे गरजेचे
वाडी : भविष्यात वाडी जलमय होण्यापासून रोखण्यासाठी चार फुटाचा तयार झालेला नाला पूर्ववत १२ फुटाचा करण्यासाठी स्थानिक प्रशासनाने तसेच आमदार खासदारांनी याकडे लक्ष देणे महत्वाचे आहे. नाल्यावरील अतिक्रमण तसेच पायल्यांच्या पुलाऐवजी पक्का स्लॅबचा पूल बनवण्याचे नियोजन करावे, त्याची मागणी अनेक दिवसापासून या परिसरातील नागरिक करत आहे. नागरिकांना या त्रासातून मुक्त करावे, पायल्याचा व्यास वाढविण्यासाठी प्रशासनाने कंबर कसणे गरजेचे आहे.
लाव्हा गावातून ७० वर्षापूर्वी आताच्या महादेव नगरातून उगम पावलेला नाला सुरुवातीला १२ फुटाचा होता. त्या नाल्याचा तेव्हा पांदण रस्त्यासारखा नागरीक उपयोग करीत होते. वस्ती वाढल्यामुळे परिसरातील पाणी त्या नाल्यावाटे अंबाझरी तलावात सोडण्यात आले. नाल्याशेजारी प्लॉटधारकांनी प्लॉट पाडले. ज्यांनी प्लॉट घेतले त्यांनी नाल्याच्या पायथ्याशी अतिक्रमण केले. त्याच नाल्याला नागनदीचा दर्जा दिला. परंतु शनिवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे नागनदीतील पाणी नागरीकांच्या घरात घुसले. ग्रामपंचायत काळात तेव्हा कमी लोकवस्ती असल्यामुळे याच नागनदीवरून इतर ठिकाणी जाण्या-येण्यासाठी पायल्याचा पूल बांधण्यात आला.
परंतु, पायल्याचा व्यास लहान असल्यामुळे काडी कचरा प्लास्टिक, लाकूड त्याला अटकतात. पुलाखालून सुरळीत पाणी जाण्यासाठी पुलाच्या ५ फुट समोर जाळी लावणे गरजेचे आहे. तसेच नागनदीचा पूल रुंद आणि उंच करण्याची गरज आहे. अन्यथा भविष्यात वाडीला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नदी पात्र पूर्वीच्या तुलनेत अरुंद झाले. अनेक ठिकाणी प्रवाहाला अडथळे निर्माण करण्यात आले आहे. त्यामुळे अतिवृष्टी झाल्यास वाडीला गंभीर परिणाम भोगावे लागतील. शिवाय नदी पात्र काही ठिकाणी अरुंद झाले आहे. नदी पाण्याची प्रवाह सुरळीत करण्यासाठी हे पात्र पूर्वीप्रमाणे मोठे करणे गरजेचे आहे.