- १८ प्रकारच्या भौतिक सुविधांचा समावेश
वाडी : वीस किंवा वीस पेक्षा कमी पट संख्येच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी व गुणवत्तापूर्ण दर्जेदार शिक्षणासाठी कमी पटसंख्येच्या शाळा त्याच परिसरात असलेल्या मध्यवर्ती शाळेत समायोजित करून समूह शाळा विकसित करण्याचा निर्णय २१ सप्टेंबर रोजी शिक्षण आयुक्तालयाने घेतलेला आहे. सदर शाळेत प्रत्येक पहिली ते पाचवीच्या वर्गाला स्वतंत्र खोली व स्वतंत्र शिक्षक मिळणार असून वर्ग सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना विषय निहाय स्वतंत्र शिक्षक मिळणार आहे.
त्याबरोबर संगणक, खेळ व इतर कला विषयासाठी सुद्धा स्वतंत्र शिक्षक देण्यात येणार आहे. कमी पट संख्येच्या समायोजित शाळांमधील विद्यार्थी समूह शाळेत ३५ ते ४० मिनिटांमध्ये पोहोचतील, यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे, जीपीएस ट्रॅकर, प्रशिक्षित वाहक, चालक व महिला पर्यवेक्षक असलेल्या सुसज्ज बस सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
राज्यात कमी पटसंख्या असलेल्या एकूण १४,७८३ शाळा असून २९,७०७ शिक्षक कार्यरत आहे. प्रती शाळा १३ सरासरी विद्यार्थी संख्या असून सबंध राज्यात १,८५,४६७ विद्यार्थी सध्या शिकत आहेत.
समूह शाळेची काही प्रमुख वैशिष्ट्ये
- दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना मिळणार दर्जेदार शिक्षण
- विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होणार
- नेतृत्व गुणाचा विकास व सांघिक भावना निर्माण होणार
- भौतिक सोयी उपलब्ध होऊन इयत्ता निहाय व विषयनिहाय शिक्षक उपलब्ध होणार
- विद्यार्थ्यांमधील इतर कलागुणांना वाव मिळणार
- मध्यवर्ती समूह शाळेमुळे कमी पटांच्या शाळेवरील नवीन इमारती दुरुस्तीचा शासनाचा खर्च वाचणार
- कमी शिक्षकांचा प्रश्न सुटणार
महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक शिक्षकेत्तर सेनेचे राज्य सरचिटणीस शरद भांडारकर म्हणाले की, कमी पट संख्येच्या शाळांमधील विद्यार्थ्यांचे सामाजिकरण व सांस्कृतीकरण तसेच त्यांच्या शैक्षणिक निकोप वाढीसाठी, सांघिक भावना व खिलाडू वृत्ती वृद्धिंगत करण्यासाठी शासनाने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे. परंतु, सदर निर्णयामुळे वाडी वस्ती वरील विद्यार्थी शिक्षव्यवस्थेतून किंवा शिक्षण प्रवाहातून बाद होणार नाहीत, यासाठी काळजी घेतली पाहिजे.