महिला सदस्यांची गोलमेज परिषद सी.पी.ए. ने आयोजित करावी – विधान परिषद उपाध्यक्ष डॉ. नीलम गोऱ्हे

02 Sep 2023 16:53:45

round table conference of women members c p a should be organized by neelam gorhe - Abhijeet Bharat 
लंडन / मुंबई : महाराष्ट्र विधानमंडळाच्या २२ सदस्यांचे शिष्टमंडळाने आज लंडन येथील ब्रिटन पार्लमेंट मधील राष्ट्रकुल संसदीय मंडळ, मुख्यालय (Commonwealth Parliamentary Association Headquarter) येथे जाऊन महासचिव स्टिफन ट्वीग यांची भेट घेतली.
 
राष्ट्रकुल संसदीय मंडळ भारत विभागात महाराष्ट्र विधिमंडळ मधील राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखा ही सर्वप्रथम स्थापन झालेली शाखा आहे. संसदीय लोकशाही संदर्भात प्रबोधन, प्रशिक्षण आणि प्रकाशन प्रसिद्धी असे विविधांगी उपक्रम स्थापनेपासून सी. पी. ए. महाराष्ट्र शाखेतर्फे विधीमंडळात राबविण्यात येत आहेत, अशी माहिती यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर आणि विधानपरिषद उप सभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी अभ्यास भेटी प्रसंगी दिली.
 
भारत हा जगातील सर्वात मोठी संसदीय लोकशाही व्यवस्था असलेला देश आहे आणि तो राष्ट्रकुल संसदीय मंडळाचा सक्रिय सभासद आहे याबद्दल स्टिफन ट्वीग यांनी गौरवोद्गार काढले. या प्रसंगी ट्वीग यांचा उभयतांच्या हस्ते शिष्टमंडळाच्यावतीने गौरवचिन्ह आणि शाल देऊन सन्मान करण्यात आला. हाऊस ऑफ कॉमन्सला शिष्टमंडळ सदस्यांनी भेट दिली आणि तेथील कार्यप्रणालीची माहिती जाणून घेतली.
 
महिला सदस्यांची गोलमेज परिषद
 
देशातील महाराष्ट्रासह काही राज्यातील विधिमंडळाच्या सन्माननीय महिला सदस्यांच्या गोलमेज परिषदा सी.पी.ए. च्या पुढाकाराने महाराष्ट्रात घेण्यात याव्यात आणि त्याव्दारे विकासाच्या संदर्भातील सर्वोत्तम कार्यपद्धती, शाश्वत विकास उद्दिष्टे, संसदीय आयुधे याबाबत अवगत करण्यात यावे अशी सूचना यावेळी झालेल्या चर्चेप्रसंगी विधानपरिषद उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मांडली. त्यात ट्वीग यांनी अनुकूलता दर्शवली आहे.
 
राष्ट्रकुल संसदीय मंडळ, लंडन हे अखिल विश्वातील संसदीय लोकशाही आणि कार्यप्रणाली अनुसरणाऱ्या लोकशाहीप्रेमी नागरिकांचे, अभ्यासगटांचे एक सशक्त व्यासपीठ आहे. संस्थेच्या दरवर्षी होणाऱ्या परिषदांमध्ये प्रत्येक सदस्य देशांच्या संसदेचे अध्यक्ष, राज्य विधानमंडळांचे पिठासीन अधिकारी, निरीक्षक, संसद-विधानमंडळांचे सचिव हे सहभागी होत असतात. या परिषदांमध्ये संसदीय कार्यप्रणालीची कक्षा आणखी विस्तारणे, सुशासन प्रणाली बळकट करणे, स्त्री-पुरुष समान हक्काची प्रस्थापना, शाश्वत विकास उद्दिष्टांची पूर्तता, संसदीय लोकशाही व्यवस्थेसमोर जागतिक दहशतवादाने उभे केलेले आव्हान आणि त्याचे निराकरण करण्यासाठीची उपाययोजना इत्यादी महत्त्वपूर्ण विषयांवर विचारमंथन घडविण्यात येते. त्याव्दारे संसदीय कार्यप्रणालीच्या मजबूतीसाठी आणि गुणवृद्धी, दोषनिवारण यासाठी नवी दिशा मिळत असते. आजच्या या अभ्यास भेटी प्रसंगी विधीमंडळ सदस्यांनी याबाबतची माहिती जाणून घेतली.
Powered By Sangraha 9.0