नागपूर :
वर्षातील सर्वात मोठा आणि आतुरततेचा सण म्हणजे गणेशोत्सव. या सणाला ऐतिहासिक वारसा आहे. राज्यात साजरा होणारा गणेशोत्सव हा अनेक देशी आणि विदेशी पर्यटकांना आकर्षित करत असतो. घराघरात देखील आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी सर्वजण जय्यत तयारी करतात. देशभरात संपूर्ण गणेशोत्सवाचे १० दिवस जणू उत्सवाचे आणि उत्साहाचे वातावरण असते. बाप्पाच्या मूर्तीला, मंदिराला आणि मंडपाला सुंदररित्या सजविले जाते. ज्याप्रमाणे बाप्पाला मोदक प्रिय असतात. तसेच गणपती बाप्पाला फुले देखील आवडतात.
आपली संस्कृती आणि परंपरेनुसार फुलांना खूप महत्व आहे. पूजा करायचे म्हटले की फुलं आलीच. देवाला फुले अर्पण केल्याशिवाय पूजा पूर्ण झाल्यासारखे वाटत नाही. फुले आपल्या सभोवतीच्या वातावरणाला प्रसन्न करतात. तसं म्हंटले तर बाप्पाच्या पूजेसाठी वापरल्या जाणाऱ्या फुलांची यादी खूप लांब आहे. जुनी मान्यता आणि नियमानुसार गणरायाला अर्पण केल्या जाणाऱ्या प्रत्येक फुलाचे एक विशिष्ट महत्व आहे. बाप्पाला लाल रंगाची फुले सर्वाधिक प्रिया असतात. काही मान्यतेनुसार, प्रत्येक लाल रंगाचे फुल हे शुभ आणि चंद्राच्या अधिपत्याखालील असते.
आज १९ सप्टेंबर रोजी घराघरात बाप्पाचे आगमन (Ganesh Chaturthi) झाले आहे. त्यामुळे या प्रसंगी गणरायाला आवडणारी फुले अर्पण करून तुम्ही त्यांना अधिक प्रसन्न करू शकता. चला तर मग जाणून घेऊया बाप्पाला आवडणारी फुले आणि त्यांचे महत्व काय आहे ते...
रुईचे फुल :
रुईचे फुल हे गणपती बाप्पाला अर्पण केले जाते. तसेच अनेक आजारांच्या उपचारासाठी देखील रुईच्या फुलांचा उपयोग केला जातो.
उंडीचे फुल :
ललिता सहस्त्रामध्ये उंडीच्या फुलाचे अध्यात्मिक महत्व सांगितले आहे. मानसिक, शारीरिक आणि अध्यात्मिक सर्व प्रकारचे त्रास दूर करण्यासाठी गणपती बाप्पाच्या पूजेसाठी या फुलांचा वापर केला जातो.
बकुळाचे फुल :
या फुलांच्या सुगंधाने सर्वत्र आनंददायी वातावरण आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. मनाला शांती देणाऱ्या या फुलांचा उपयोग देखील गणपती बाप्पाच्या पूजेसाठी केला जातो.
जास्वंदाचे फुल :
जास्वंदाचे फुल हे बाप्पाचे सर्वाधिक प्रिय फुल आहे. जास्वंद फुलाला संस्कृतमध्ये जपाकुसुम म्हणून ओळखले जाते. काही मान्यतेनुसार, जास्वंदाची फुले ही मनातील नकारात्मकता नाहीशी करून घरातील समृद्धीचा वास सुनिश्चित करतात.
कदंबाचे फुल :
कौशल्य आणि प्रतिभेचे प्रतीक असलेला कदंब फुल हे लहान पिवळ्या गुच्छांमध्ये आढळते. देवी पार्वतीच्या पूजेमध्ये कदंबा फुलाचे खूप महत्व आहे. गणपती बाप्पाला देखील हे फुल अर्पण केले जाते.
मधुलाई (डाळिंबाचे फुल) :
अनेक भाविक बाप्पाला मधुलाई चे फुल म्हणजेच डाळींबाचे फुल अर्पण करता. असे म्हटले आते की, बाप्पा डाळिंबाची फुलांचा आणि फळांचा स्वीकार करून भक्ताला समृद्धी आणि कल्याणाचा आशीर्वाद देतात.
जाईचे फुल :
जाईच्या फुलांचा सुगंध फार सुंदर असतो. असे मानले जाते की, जाईचे फुल बाप्पाला अर्पण केल्याने वैवाहिक जीवनातील मतभेद दूर होतात आणि नात्यांत प्रेम आणि शांतता येते.
पारिजातकाचे फुल :
पारिजातक किंवा रातराणीच्या अशी ओळख असलेले हे फुल दिसायला जितके आकर्षक असतात, त्यांचा सुंगंध देखील तितकाच सुंदर असतो. हे फुल निशाचर असतात. म्हणजे ते रात्री उमलतात आणि दिवसा त्यांच्या पाकळ्या गळतात. गणपती बाप्पाचे भाविक आपल्या अपत्यांच्या प्रगतीसाठी हे फुल त्यांना अर्पण करतात.
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.