इटलीतील प्रदर्शनात महाराष्ट्रातील कोल्हापुरी चप्पल व चर्मवस्तू

    18-Sep-2023
Total Views |

kolhapuri chappals and leather goods from maharashtra exhibited in italy
 
 
इटली :
महाराष्ट्र शासनाच्यावतीने राज्यातील चर्मोद्योगातील चर्मकार समाजाच्या नवउद्योजकांना व चर्मोद्योगास आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यात आली आहे. इटलीमधील मिलान येथे १२४ व्या एमआयपीईएल प्रदर्शनात राज्यातील कोल्हापुरी चप्पल व चर्मवस्तू मागणी नोंदविण्यासाठी ठेवण्यात आल्या आहेत.
 
संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या सुवर्णजयंती वर्षानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली व सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांच्या मार्गदर्शनाखाली महामंडळाने १७ ते २० सप्टेंबर या कालावधीत मिलान येथे १२४ व्या एमआयपीईएल प्रदर्शनामध्ये सहभाग घेतला आहे. राज्याच्या वतीने प्रथमच चर्मोद्योगातील चर्मकार समाजाच्या नवउद्योजकांना या प्रदर्शनात सहभागी करण्यात आले आहे.
 
या प्रदर्शनामध्ये महामंडळाने उत्पादित केलेल्या कोल्हापुरी चप्पलला चांगली मागणी आहे. तसेच मुंबईतील धारावी येथील कारागिरांनी तयार केलेल्या महिला बॅगना सुद्धा चांगली मागणी आहे. नुकतेच महामंडळाच्या प्रयत्नातून कोल्हापुरी चप्पलसाठी जीआय टॅग मिळाला असल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कोल्हापुरी चप्पलची निर्यात मोठ्या प्रमाणात होण्यास चालना मिळणार आहे.
 
या प्रदर्शनात महामंडळाचा स्टॉल लावण्यात आला असून या स्टॉलला महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभिये यांनी भेट दिली. या भेटीदरम्यान गजभिये यांनी कोल्हापुरी चप्पलची जास्तीत जास्त विक्री होण्यासाठी विपणन व प्रसार करावे, असे सांगितले. प्रदर्शनातील चर्मवस्तू व पादत्राणांच्या विविध स्टॉलला भेट देऊन, अशाच प्रकारचे उत्पादने महामंडळाच्या उत्पादन केंद्रात तयार करावेत, अशा सूचना संबंधितांना दिल्या.