भारतच आशियाचा राजा

    18-Sep-2023
Total Views |

india-wins-asia-cup-2023-cricket-champions - Abhijeet Bharat 
रविवारी कोलंबोत झालेल्या आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात भारताने यजमान श्रीलंकेचा दहा विकेट्सने धुव्वा उडवत आशिया चषकावर विक्रमी आठव्यांदा नाव कोरत इतिहास घडवला. अंतिम सामन्यात भारताच्या वेगवान गोलंदाजांनी त्यातही मोहम्मद सिराजने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजी करत श्रीलंकेच्या फलंदाजांची पळता भुई थोडी केली. मोहम्मद सिराजने अंतिम सामन्यात भेदक गोलंदाजी करताना अवघ्या २१ धावात सहा बळी मिळवले. विशेष म्हणजे त्याने एकाच षटकात श्रीलंकेचे चार फलंदाज बाद केले. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय गोलंदाज ठरला त्याला हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमरा यांनी चांगली साथ दिली. हार्दिकने तीन तर बुमराने १ बळी मिळवत श्रीलंकेला अवघ्या ५० धावात रोखले.
 
भारतच्या सलामीच्या जोडीने अवघ्या ६.१ षटकात हे लक्ष पार करून आशिया चषकावर मोहोर उमटवत आपणच आशियाचा राजा आहोत हे सिद्ध केले. या सामन्याचा मानकरी ठरलेल्या वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने आपल्याला मिळालेल्या सामन्याचा मानकरी पुरस्काराची रक्कम ग्राऊंडसमनला देऊन प्रेक्षकांची मने जिंकली. आपण फक्त चांगला गोलंदाजच नसून चांगला माणूसही आहे हे त्याने आपल्या कृतीतून दाखवून दिले. त्याच्या या कृतीतून तो त्याचे पाय आजही जमिनीवर आहेत हे त्याने दाखवून दिले आहे. भारताने या स्पर्धेत अप्रतिम कामगिरी केली. गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाड्यांवर भारतीय खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. भारताच्या सर्वच खेळाडूंनी चांगली कामगीरी करून आपण फॉर्मात असल्याचे दाखवून दिले. रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, के एल राहुल, ईशान किशन या भारताच्या सर्वच फलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली. गिल, कोहली आणि राहुल यांनी तर शतके झळकावली.
 
रोहितने काही अर्धशतकी खेळी करत संघाला चांगली सुरवात दिली शिवाय त्याने संघाचे अप्रतिम नेतृत्व केले. गोलंदाजीतही बुमराह, शमी, सिराज, जडेजा आणि कुलदीप यादव यांनी चांगली कामगिरी केली. हार्दिक पंड्याने दमदार अष्टपैलू कामगिरी केली. कुलदीप यादव तर या स्पर्धेत भारताचा ट्रम्पकार्ड बनला होता, त्याची फिरकी प्रतिस्पर्धी संघातील कोणत्याच फलंदाजाला समजली नाही. विश्वचषकात तर तो भारताचा एक्स फॅक्टर ठरणार आहे. ही स्पर्धा भारतीय संघासाठी खूप महत्वाची आहे हे मी माझ्या आशिया चषक; विश्वचषकाची रंगीत तालीम या लेखात नमूद केले आहे. ज्याप्रमाणे मुख्य परिक्षेपूर्वी पूर्व परीक्षा असते ही पूर्वपरीक्षा म्हणजे मुख्य परीक्षेची रंगीत तालीम असते. मुख्य परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची किती तयारी झाली हे पूर्व परीक्षेद्वारे जोखता येते.
 
आशिया चषकही भारतासाठी विश्वचशकाची पूर्वपरीक्षा होती आणि या पूर्व परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळवून भारताने आपण विश्वचशकासाठी तयार असल्याचे जगाला दाखवून दिले आहे. पुढील महिन्यात पाच तारखेपासून विश्वचषकाला प्रारंभ होणार आहे. मागील बारा वर्षांपासून भारताने ही स्पर्धा जिंकली नाही आता आशिया चषक जिंकल्याने भारतच विश्वचषक जिंकणार याची खात्री देशातील १४० कोटी जनतेला पटली आहे. भारतीय संघानेही आशिया चषकावर नाव कोरत आपण आशियाचा राजा आहोत हे सिद्ध करून आता जग जिंकण्यास तयार असल्याचे दाखवून दिले आहे. आज आशिया जिंकला उद्या अवघे विश्व ताब्यात घेण्याकडे कूच करणाऱ्या भारतीय संघाचे मनापासून अभिनंदन आणि संघाला विश्वचषकासाठी शुभेच्छा!
 
श्याम बसप्पा ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५
 
*Disclaimer : ब्लॉग हे स्वतंत्र व्यासपीठ आहे. त्यामुळे यात मांडले गेलेले विचार हे लेखकाचे आहेत.