मारबत मिरवणूक परंपरेला १३९ वर्ष पूर्ण; असा आहे मारबत मिरवणुकीचा इतिहास

15 Sep 2023 08:15:00
 
Nagpur-Marbat-Festival-History - Abhijeet Bharat
 
नागपूर : नागपुरातील राजघराण्यातील बकाबाई या महिलेने इंग्रजांसोबत हातमिळवणी केली होती. यांनतर बकाबाई यांच्या पुतळ्याची मिरवणूक काढून निषेध करण्यात आला होता. तेव्हापासून नागपूरात मारबत परंपरा सुरू झाली असून तिला जवळपास १३९ वर्षांचा इतिहास आहे. नागपूर शहराला देखील देशातील एकमेव असे मारबत मिरवणुकीचे शहर म्हणून ओळखले जाते. या उत्सवला आता महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास मंडळानेही मान्यता दिली आहे. त्यामुळे नेमकी ही मारबत परंपरा आणि याचा पौराणिक इतिहास काय आहे हे आपण आज जाणून घेणार आहोत.
 
नागपूरची ओळख ही संत्रीनगरी, झिरो माईलचे शहर आणि आताच्या काळात सर्वाधिक वेगाने प्रगत होणारे शहर अशी असली, तरी कित्येक वर्षे देशातील एकमेव असे मारबत मिरवणुकीचे शहर म्हणूनही नागपूरला ओळखले जाते. या मारबत उत्सवाला आता राज्य पर्यटन विकास मंडळानेही मान्यता दिली आहे. इंग्रजांच्या राजवटीत देशात नागरिकांना एकत्र येण्यासाठी टिळकांनी पुण्यात गणेशोत्सव सुरू केला, त्याआधीपासूनच नागपूर येथे मारबत उत्सव सुरू झाला. प्राचीन काळातील मानवजातीसाठी घातक ठरणाऱ्या रुढी-परंपरांचे प्रतीक म्हणजे ‘काळी मारबत’! तर चांगल्या परंपरांचे प्रतीक म्हणजे ‘पिवळी मारबत’ असे आहे. काळ्या मारबतीला १४३ वर्षांचा तर पिवळ्या मारबतीला १३९ वर्षांचा इतिहास आहे. समाजातील अनिष्ट प्रथांचे उच्चाटन करण्याच्या उद्देशाने तान्हा पोळ्याच्या दिवशी चांगल्या आणि वाईट प्रतीकांची मिरवणूक काढली जाते. ती म्हणजे काळी व पिवळी मारबतीची मिरवणूक. १०० वर्षांच्या काळात अनेक परंपरा लोप पावत असताना नागपूरने त्यांची मारबत मिरवणुकीची ऐतिहासिक पंरपरा कायम ठेवली आहे.
 
 
 
मारबत या उत्सवाचा संबंध महाभारतापर्यंत जोडला जातो. त्याकाळात मायावी राक्षसाने श्रीकृष्णाचा वध करण्यासाठी स्त्रीचे रूप धारण केले होते. पण श्रीकृष्णाने तिला ठार मारले. त्यानंतर गावकऱ्यांनी तिला गावाबाहेर नेऊन जाळले. तेव्हापासून मारबत हा उत्सव सुरू झाल्याची दंतकथा सांगितली जाते. तर भोसले राजघराण्यातील बकाबाई या महिलेने इंग्रजांसोबत हातमिळवणी केली होती. तिच्या पतीने याला विरोध केला नव्हता. म्हणून त्याच्या पुतळ्याची मिरवणूक काढून निषेध करण्यात आला होता.
 
नागपुरातील मारबत मिरवणुकीचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन २०१३ मध्ये महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने मारबत उत्सवाला मान्यता दिली. त्यामुळे हा उत्सव देश-विदेशात पोहोचला. मारबत उत्सव जाणून घेण्यासाठी अनेक विदेशी पर्यटक दरवर्षी नागपुरात येतात. लाखो लोकांची गर्दी मिरवणुकीच्या मार्गाने होत असल्याने त्या मार्गावर विविध खाद्यपदार्थांची दुकाने लागतात. इतक्या वर्षानंतरही या उत्सावाने आपले महत्त्व टिकवून ठेवले आहे. मिरवणुकीच्या निमित्ताने तयार करण्यात आलेले देखावेरूपी पुतळे म्हणजेच ‘बडगे’. हेच बडगे मारबत मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण असते. दरवर्षी कोणाचा बडगा तयार करणार याबाबत उत्सुकता असते. एकप्रकारे हा बडग्याचा उत्सव असतो. त्यात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय मुद्यांसह स्थानिक समस्यांवरही भाष्य करणारे फलक आणि सूचक ओळींनी चर्चेचा विषय घेऊन बडगे तयार केले जाते.
Powered By Sangraha 9.0