ज्येष्ठ लेखक, विचारवंत प्रा. हरी नरके यांचे निधन

09 Aug 2023 15:59:49

senior writer thinker prof death of hari narke - Abhijeet Bharat 
मुंबई : ज्येष्ठ लेखक, विचारवंत व महात्मा फुले समता परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. हरी नरके यांचे बुधवारी सकाळी निधन झाले. वयाच्या ६० व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेले हरी नरके यांना आज सकाळी उपचारासाठी मुंबईतील एशियन हार्ट रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याच दरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाल्याचे वृत्त समोर आले आहे. हरी नरके यांच्या निधनाने पुरोगामी चळवळीची व समता परिषदेचे मोठे नुकसान झाले आहे.
 
प्रा. हरी नरके हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. यापूर्वी देखील मुंबईतील लीलावती रुग्णालयात त्यांच्यावर १५-२० दिवस उपचार करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना राजकोट येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा देखील झाली. दरम्यान गुरुवारी मुंबई होऊ घातलेल्या समता परिषदेच्या बैठकीसाठी ते आज पहाटे राजकोटहून मुंबईला येत होते. यावेळी त्यांना गाडीत उलट्यांचा त्रास होऊ लागला. त्यानंतर त्यांना उपचारासाठी तातडीने मुंबईतील एशियन हार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. प्रा. हरी नरके यांच्या निधनाने केवळ समता परिषदेतच नाही तर राजकीय क्षेत्रातूनही हळहळ व्यक्त होत आहे.
 
पुरोगामी विचारधारेचे जतन, संवर्धन करणारा परखड विचारवंत गमावला - मुख्यमंत्री शिंदे
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ लेखक, विचारवंत प्रा. हरी नरके यांच्या निधनावर त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. 'महाराष्ट्रातील पुरोगामी विचारधारेचे जतन, संवर्धन करणारा परखड असा विचारवंत आपण गमावला आहे, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
 
'महाराष्ट्राच्या विचार - व्यासपीठावर आपल्या अभ्यासपूर्ण आणि परखड विचारांनी प्रा. हरी नरके यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. फुले - शाहू - आंबेडकर यांचा विचार महाराष्ट्रासह सर्वदूर पोहोचावा यासाठी त्यांनी सातत्यपूर्ण प्रयत्न केले. महात्मा जोतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांचा जीवनपरिचय आणि त्यांच्या विषयीचे संशोधनात्मक लेखन यांचा त्यांचा व्यासंग होता. यातून त्यांनी उत्कृष्ट अशा ग्रंथसंपदेची निर्मिती केली. वक्तृत्वाची आगळी शैली आणि अभ्यासपूर्ण मांडणी हे त्यांचे वैशिष्ट्य होते. त्यांनी समता परिषदेच्या माध्यमातून रचनात्मक काम केले. त्यांच्या निधनामुळे पुरोगामी चळवळ आणि राज्यातील अभ्यास - संशोधनात्मक लेखन प्रवाहाची हानी झाली आहे,' असे नमूद करून मुख्यमंत्र्यांनी ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
 
ओबीसी, परिवर्तनवादी चळवळीतील बुद्धिवादी व्यक्तिमत्व हरपले - उपमुख्यमंत्री पवार
 
उपमुख्यमंत्री अजित पवार यानी प्रा. हरी नरके यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. ते म्हणाले, ज्येष्ठ लेखक, विचारवंत प्रा. हरी नरके यांच्या निधनाने महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर श्रद्धा असलेला, ओबीसी हक्कांसाठीच्या चळवळीत आघाडीवर राहून लढणारा कृतिशील कार्यकर्ता आपण गमावला आहे. ते सामाजिक प्रश्नांचे अभ्यासक, परखड भाष्यकार होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या साहित्याचे अभ्यासक, संशोधक, व्याख्याते ही त्यांची ओळख होती. तत्कालिन पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासनाचे प्रमुख म्हणूनही त्यांनी काम केले होते. प्रा. हरी नरके यांनी अनेक शासकीय समित्यांवर तज्ज्ञ सदस्य म्हणून काम केले आहे. त्यांच्या निधनाने दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांची बाजू हिरिरीने मांडणारे, ओबीसी चळवळीला वाहून घेतलेले बुद्धिवादी व्यक्तिमत्व हरपले आहे. त्यांचे निधन ही महाराष्ट्राच्या साहित्यिक, सामाजिक, परिवर्तनवादी चळवळीची हानी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, अशा भावना उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी व्यक्त केली.
Powered By Sangraha 9.0