नागपूर जिल्ह्यात 'मेरी माटी, मेरा देश' अभियानांतर्गत जिल्हाभर पंचप्रण शपथ

    09-Aug-2023
Total Views |
  • शपथ कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन
  • सर्व ग्रामपंचायती, कार्यालयामध्ये शपथ कार्यक्रम
in nagpur district panchpran oath under meri mati mera desh campaign - Abhijeet Bharat
 
नागपूर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या समारोप निमित्त संपूर्ण देशभर ‘मेरी माटी, मेरा देश’ हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत उद्या 9 ऑगस्ट रोजी संपूर्ण नागपूर जिल्हाभर पंचप्रण शपथ घेतली जाणार आहे. नागरिकांनी या शपथ कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
 
उद्या दिनांक 9 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता आयुक्त कार्यालय, महानगर पालिका कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय,जिल्हा, तालुकास्तरीय सर्व कार्यालये तसेच ग्रामपंचायतींमध्ये शपथ कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात जिल्हा, तालुका व ग्रासमस्तरावरील सर्व अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी, नागरिकांनी एकत्र येऊन पंचप्रण (शपथ) घ्यावयाची आहे. शपथ घेतांना हातात माती किंवा मातीचे दिवे प्रज्वलित करून पंच प्रण शपथ घेण्यात यावी. नागरिकांनी आपल्या सोईप्रमाणे नजीकचे शासकीय कार्यालय, ग्रामपंचायत येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमात सहभागी व्हावे.
 
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या समारोपीय उपक्रमांतर्गत ‘मेरी माटी, मेरा देश’ (मिट्टी को नमन विरों को वंदन) अभियान राबविण्यात येत असून या उपक्रमानुसार गाव ते शहरांपर्यंत आपल्या मातीविषयी जनजागृती, प्रेम आणि साक्षरता निर्माण व्हावी, हा या अभियानाचा उद्देश आहे. शपथमध्ये नागरिकांसह बचतगटाच्या महिलांनी मोठ्या प्रमाणात सहकुटुंब सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी केले आहे.
 
अशी घ्यावी शपथ
 
पंच प्रण शपथ पुढील प्रमाणे घेण्यात यावी....आम्ही शपथ घेतो की, भारतास 2047 पर्यंत आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनविण्याचे स्वप्न साकार करु. गुलामीची मानसिकता मुळापासून नष्ट करु. देशाच्या समृध्द वारशाचा गौरव करु. भारताची एकात्मता बलशाली करु आणि देशाचे संरक्षण करणाऱ्यांप्रती सन्मान बाळगू. देशाचे नागरीक म्हणून सर्व कर्तव्यांचे पालन करु.
अभियानात सर्वसामान्य नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी https://merimaatimeradesh.gov.in/ हे संकेतस्थळ सुरु करण्यात आले आहे. या संकेतस्थळावर शपथ घेतांना मातीचा दिवा किंवा माती हाती धरून काढलेले सेल्फी अपलोड करता येतील.