वॉशिंग्टन : गेल्या काही दिवसात सोशल नेटवर्किंग आणि मायक्रोब्लॉगिंग संकेतस्थळ असलेल्या ट्विटरमध्ये एलॉन मस्कने अनेक मोठे बदल केले आहेत. एलॉन मस्कने काही दिवसांपूर्वी ट्विटरचे नाव बदलून 'X' केले. आता या नंतर 'X' पुन्हा नवीन वैशिष्ट्ये जोडली जाणार आहेत. एलॉन मस्कने नुकतीच याबाबत एक मोठी घोषणा केली आहे. 'X' वर लवकरच व्हिडिओ आणि ऑडिओ कॉलिंगची सुविधा उपलब्ध होईल, असे एलॉन मस्कने जाहीर केले आहे. त्यांनी एक्सवर एक पोस्ट करून याबाबत माहिती दिली आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम आणि फेसबुक प्रमाणे आता 'X' वर देखील युजर्सला आता व्हिडिओ आणि ऑडिओ कॉल करता येणार आहे. एलॉन मस्कने याबाबत माहिती देताना सांगितले की, व्हिडिओ आणि ऑडिओ कॉल्स 'X' वर येत आहेत. सर्व प्रकारचे फोन आणि लॅपटॉप 'X' च्या नवीन फीचरचा लाभ घेऊ शकतील. हे फीचर अँड्रॉइड, आयओएस, मॅक आणि लॅपटॉपमध्ये सहज वापरता येणार आहेत. महत्वाचे म्हणजे या व्हिडिओ आणि ऑडिओ कॉलसाठी कोणत्याही फोन नंबरची आवश्यकता नाही. X हे प्रभावी जागतिक ॲड्रेस बुक आहे.