आशियाचषक; विश्वचशकाची रंगीत तालीम

    31-Aug-2023
Total Views |
 
asia cup color rehearsal of the world cup - Abhijeet Bharat
 
कालपासून (३० ऑगस्ट) श्रीलंकेत ५० षटकांचा म्हणजे एकदिवसीय क्रिकेटचा रणसंग्राम सुरू झाला आहे. आशिया खंडातील क्रिकेटचा राजा कोण हे ठरवण्यासाठी भारतासह आशिया खंडातील सहा देश एकमेकांना भिडणार आहेत. या स्पर्धेत जो संघ विजयी होईल तो आशिया चषकावर स्वतःचे नाव कोरणार आहे. आशिया खंडातील भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि पात्रता फेरीत विजय मिळवून मुख्य स्पर्धेसाठी पात्र ठरलेला नेपाळ या सहा संघात ही स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना काल पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात झाला असून २ सप्टेंबर रोजी या स्पर्धेतील सर्वात हाय व्होल्टेज सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तानमध्ये रंगणार आहे.
 
वास्तविक आशिया चषकाची पात्रता फेरी याआधीच सुरू झाली असून या पात्रता फेरीत नेपाळ हा संघ पहिल्यांदाच पात्र ठरला आहे असून तो भारत, पाकिस्तान यांच्या गटात समाविष्ट झाला आहे. दुसऱ्या गटात श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान हे देश आहेत. प्रत्येक गटातून दोन संघ असे एकूण चार संघ सुपर फोरसाठी पात्र ठरतील त्यांच्यात पुन्हा लढत होऊन दोन संघ अंतिम फेरीत पोहोचतील. या स्पर्धेत सहा संघ खेळत असले तरी भारत आणि पाकिस्तान या दोन संघांना विजेतेपदासाठी पसंती दिली जात आहे. भारत आणि पाकिस्तान हे या स्पर्धेत प्रबळ दावेदार मानले जात असले तरी तरी श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान हे संघही चांगली तयारी करुन मैदानात उतरले आहेत त्यामुळे ही स्पर्धा रंगतदार ठरेल यात शंका नाही.
 
भारतासाठी ही स्पर्धा विशेष महत्वाची आहे कारण २०१६ आणि २०१८ साली भारताने विजेतेपद मिळवले आहे. मागील वर्षी म्हणजे २०२२ साली ही स्पर्धा जिंकून भारत आशिया चषक जिंकण्याची हॅट्ट्रिक साजरी करेल का याकडे क्रिकेट प्रेमींचे लक्ष लागले होते. मात्र दुर्दैवाने भारत त्या स्पर्धेत अपयशी ठरला आणि श्रीलंका मागील वेळेचा विजेता ठरला. मागील वेळी झालेली चूक दुरुस्त करून भारत यावेळी विजेता ठरेल, अशी आशा भारताच्या १४० कोटी जनतेला आहे. यावेळी भारतीय संघ या स्पर्धेत हॉट फेव्हरेट समजला जातोय. कारण भारतीय संघ या स्पर्धेतील सर्वात संतुलित संघ आहे.
 
भारताचे सर्व खेळाडू अनुभवी असून फॉर्मात आहेत. भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि ईशान किशन यांची सलामीची जोडी प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर तुटून पडली की मधल्या फेरीचे काम हलके होऊ शकते. तिसऱ्या क्रमांकावर शुभमन गिल हा फॉर्ममध्ये असलेला युवा फलंदाज आपल्या बॅटचा जलवा दाखवेल. माजी कर्णधार विराट कोहली हा चौथ्या क्रमांकावर येऊ शकतो. दोन ते तीन वर्ष बॅडपॅच मध्ये असलेला विराट आता बॅडपॅच मधून बाहेर पडला असून त्याची बॅट आता पुन्हा पूर्वीसारखी तळपू लागली आहे. विराट कोहली फॉर्मात आल्याने भारताला या स्पर्धेत विजेतेपद मिळवण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. पाचव्या क्रमांकावर सुर्यकुमार यादव येईल तो सध्या चांगलाच फॉर्मात असून एकहाती सामना जिंकून देऊ शकतो. त्याच्यानंतर अष्टपैलू खेळाडू आणि या भारताचा सर्वात स्फोटक फलंदाज हार्दिक पांड्या येईल ज्या दिवशी हार्दिक पांड्याची बॅट चालते त्यादिवशी भारत विजयी होतो. त्यानंतर के एल राहुल किंवा श्रेयश अय्यर फिनिशरची भूमिका निभावतील. रवींद्र जडेजा हा देखील अष्टपैलू खेळाडूची भूमिका बजावत असल्याने संघाचे संतुलन वाढले आहे.
 
वेगवान गोलंदाजीची धुरा अनुभवी जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज सांभाळतील तर फिरकी गोलंदाजीची धुरा अक्षर पटेल, कुलदीप यादव यांच्यावर आहे. हे सर्व खेळाडू एकदिवसीय क्रिकेटमधील मधील जाणकार खेळाडू आहेत विशेष म्हणजे या खेळाडूंना श्रीलंकेमध्ये खेळण्याचा चांगला अनुभव आहे. तेथील खेळपट्टी आणि हवामानाशी भारतीय खेळाडू परिचित आहेत. त्यामुळे भारतच या स्पर्धेचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. भारताला या स्पर्धेत जर कोणी आव्हान देऊ शकेल तर तो पाकिस्तान. भारत आणि पाकिस्तान यांच्यात २ सप्टेंबर रोजी पहिली लढत होत असून त्या सामन्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. नेहमीप्रमाणे हा सामना रंगतदार होणार यात शंका नाही.
 
अलीकडच्या काळात भारताप्रमाणेच पाकिस्तानची कामगिरीही चांगली झाली आहे. त्यांचा कर्णधार बाबर आझम हा तुफान फॉर्ममध्ये असून रिझवान नावाचा त्यांचा विकेट किपर बॅट्समन देखील फॉर्ममध्ये आहे. विशेष म्हणजे या दोंघांनी याआधी भारताविरुद्ध चांगली कामगिरी केली आहे. या दोघांनीच मागील वर्षीच्या टी २० विश्वचषक स्पर्धेत अभेद्य भागीदारी करून भारताला पराभूत केले होते. त्यामुळे या दोघांना लवकरात लवकर बाद करणे हे भारतीय गोलंदाजाचे लक्ष असेल. त्यांच्याकडे दर्जेदार वेगवान गोलंदाज आहे. भारतीय फलंदाजांना बाद करण्यासाठी ते जीवाचे रान करतील यात शंका नाही त्यामुळेच हा सामना रंगतदार ठरेल. क्रिकेटमध्ये कोण विजयी ठरेल हे कोणीही छातीठोकपणे सांगू शकत नाही तरी मागील कामगिरीचा आणि सध्या असलेल्या फॉर्मचा विचार करता भारतच या स्पर्धेत अजिंक्य ठरेल आणि आशिया चषकावर आपले नाव कोरेल असा विश्वास १४० कोटी देशवासियांना आहे. ही स्पर्धा भारताच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे कारण ही स्पर्धा म्हणजे एकदिवसीय विश्वचशकाची रंगीत तालीम आहे.
 
अवघ्या महिन्यानंतर म्हणजे ऑक्टोबर महिन्यात भारतातच एकदिवसीय सामन्यांचा विश्वचषक स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा जिंकली तर विश्वचषक स्पर्धेसाठी प्रबळ दावेदार ठरेल शिवाय खेळाडूंना देखील विश्वचषक स्पर्धेसाठी मोठा आत्मविश्वास मिळेल. एकूणच ही स्पर्धा विश्वचषक स्पर्धेची रंगीत तालीम असल्याने या स्पर्धेकडे केवेळ भारतच नव्हे तर सर्वच संघ गांभीर्याने पाहत आहे. ही स्पर्धा म्हणजे विश्वचशकाची पायरी आहे ही पायरी ओलांडल्यास भारतीय संघ विश्वचषकाचा शिवधनुष्य आरामात उचलू शकतो यात शंका नाही. भारतीय संघाला आशिया चषक स्पर्धेसाठी मनापासून शुभेच्छा!
 
श्याम बसप्पा ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५
 
*Disclaimer : ब्लॉग हे स्वतंत्र व्यासपीठ आहे. त्यामुळे यात मांडले गेलेले विचार हे लेखकाचे आहेत.