सणांपूर्वी केंद्राची सर्वसामान्यांना भेट! घरगुती LPG सिलेंडरमध्ये २०० रुपयांची कपात

    29-Aug-2023
Total Views |
 
centre reduces domestic lpg cylinder price by rs 200 - Abhijeet Bharat
 
नवी दिल्ली : भारतात सणासुदीच्या पर्वाला सुरुवात होत आहे. अशातच केंद्र सरकारने मंगळवारी मोठा निर्णय घेत सर्वसामान्य नागरिकांना सणांपूर्वी दिलासा दिला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने सर्व वापरकर्त्यांसाठी घरगुती LPG गॅस सिलेंडरच्या किमतीत २०० रुपयांची कपात केली आहे. ऐन रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी केंद्राने हा महत्वाचा निर्णय घेतला. हा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील महिलांना ओणम आणि रक्षाबंधनाची भेट आहे, असे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयाबाबत पत्रकारांना माहिती देताना माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर म्हणाले.
 
 
अनुराग सिंह ठाकूर म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व वापरकर्त्यांसाठी घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत २०० रुपयांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. रक्षाबंधनाच्या निमित्ताने देशातील महिलांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेली ही भेट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली, त्यात हा निर्णय घेण्यात आला.
 
 
ठाकूर म्हणाले की, केंद्र सरकारने आणखी ७५ लाख उज्ज्वला गॅस लाभार्थी जोडण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या या योजनेचे ९.६ कोटी लाभार्थी आहेत. भारत आपल्या नैसर्गिक वायूच्या ६० टक्के गरजांसाठी आयातीवर अवलंबून आहे. सध्याच्या सरकारने महिलांच्या विकासासाठी पक्की घरे, शौचालये, अतिरिक्त अन्नधान्य आणि कोविड महामारीच्या काळात थेट लाभ हस्तांतरण यासह अनेक योजना सुरू केल्या आहेत, असेही ठाकूर यांनी सांगितले.