Sana Khan Murder Case : नागपूर पोलिसांची जिल्हा सत्र न्यायालयात धाव; आरोपीविरोधात केली 'ही' मागणी

    28-Aug-2023
Total Views |

sana khan murder case nagpur police run district sessions court  - Abhijeet Bharat 
नागपूर : भाजप नेत्या सना उर्फ हिना खान हत्या प्रकरणाला २६ दिवसांचा कालावधी लोटला असून या प्रकरणातील गूढ अधिक वाढत चालले आहे. या सोबतच नागपूर पोलिसांच्या अडचणीही वाढत चालल्या आहे. दिवसेंदिवस या प्रकरणाला नवे वळण येत असून ते अधिक गुंतत आहे. सना खानचा मृतदेह आणि मोबाईल फोन मिळत नसल्याने नागपूर पोलिसांच्या तपासात अनेक अडचणी निर्माण होत आहे. सना खान हत्या प्रकरणात नागपूर पोलिसांना अद्यापही समाधानकारक यश हाती लागलेले नाही. त्यामुळे नागपूर पोलिसांनी आता जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली असून या प्रकरणातील मुख्य आरोपी अमित साहू याची नार्को चाचणी करण्याची परवानगी मागण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. या प्रकरणी आज न्यालयात सुनावणी आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, सना खान हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अमित साहू रोज माहिती बदलत असल्याने पोलिसांच्या तपासा अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे सनाच्या कुटुंबीयांनी अमित साहूच्या नार्को टेस्ट चाचणीची मागणी केली आहे. यानंतर नागपूर पोलिसांनी जिल्हा सत्र न्यायालयात याबाबतचा अर्ज दाखल केला आहे.
 
सना खान हत्या प्रकरणात नागपूर पोलिसांनी आता तांत्रिक दृष्टीने तपास सुरू केलेला आहे. सना खानची हत्या होऊन जवळजवळ २६ दिवस झाले आहेत. सना खानचा मृतदेह आणि मोबाईल फोन अद्यापही पोलिसांच्या हाती लागला नाही. सनाच्या मोबाईलमध्ये खूप काही दडले असावे म्हणून आरोपींनी सनाचा मोबाईल नष्ट केल्याचा दाट संशय नागपूर पोलिसांना आहे.
 
पोलीस गुगलची मदत घेणार
 
सना खान हत्या प्रकरणात मोबाईल हा अत्यंत महत्त्वाचा पुरावा ठरू शकतो. म्हणून नागपूर पोलिसांनी सनाच्या मोबाईलचा डेटा रिकव्हर करण्यासाठी गुगलकडे मदत मागितली आहे. सना खानच्या मोबाईलमध्ये बरीच माहिती आणि रहस्य दडलेले असू शकतात. अनेक चेहरे देखील पुढे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनी सना खानच्या मोबाईल डेटावरच लक्ष केंद्रित केले आहे. सनाच्या मोबाईलचा डेटा हा क्वाउड किंवा गुगल ड्राईव्हवर स्टोअर असल्यास गुगलच्या मदतीने तो रिकव्हर केला जाऊ शकतो. म्हणून पोलिसांनी यासंदर्भात गुगलकडे मदत मागितली आहे.
 
सना खान हत्या प्रकरणात नागपुर पोलिसांनी मध्यप्रदेशातील तेंदुखेडाचे काँग्रेस पक्षाचे आमदार संजय शर्मा यांची २४ ऑगस्ट रोजी सलग तीन तास चौकशी केली. चौकशी दरम्यान पोलिसांनी सना खान हत्या प्रकरणाचे मुख्य आरोपी अमित शाहू आणि रवी शंकर यादव यांना आमदार संजय शर्मा यांच्यासमोर बसवून चौकशी करण्यात आली. सना खानची हत्या केल्यानंतर आरोपीनी संजय शर्मा यांच्यासोबत संपर्क केला होता. त्यानंतर संजय शर्मा यांनी आरोपींना मदत केल्याचा संशय नागपूर पोलिसांचा आहे. यासंदर्भात आमदार संजय शर्मा यांना तपास अधिकाऱ्यांनी काही प्रश्न विचारले. तीन तासांच्या चौकशीनंतर संजय शर्मा यांनी माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचे म्हटले आहे.
 
आरोपी अमित आमदाराकडे काम करायचा
 
सना खान प्रकरणातील मुख्य आरोपी अमित शाहू आमदार संजय शर्मा यांच्याकडे १५ वर्षांपूर्वी कामाला होता. काम सोडल्यानंतर तो माझ्या संपर्कात नसल्याची माहिती संजय शर्मा यांनी दिली आहे. सनाच्या हत्येनंतर अमित शाहूसोबत भेट झाली, पण त्याने यासंदर्भात मला कोणतीही माहिती दिली नसल्याचे ते म्हणाले. दुसरा आरोपी रवी शंकर यादव यांना मी ओळखतो, तो ठेकेदार आहे, त्याला ओळखत असल्याची कबुली आमदार संजय शर्मा यांनी दिली आहे. नागपूर पोलिसांच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे दिले आहेत.
 
आरोपीना फाशीची शिक्षा व्हावी; सनाची आईची मागणी
 
पोलीस उपायुक्त-२ कार्यालयात आमदार संजय शर्मा आणि आरोपींची चौकशी सुरू असताना सना खान यांची आई मेरुणीसा या देखील त्या ठिकाणी पोहोचल्या होत्या. सना बेपत्ता होऊन आता २३ दिवस लोटले असतानाही पोलीसांना तिचा मृतदेह हा सापडत नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. सना खान संदर्भात हनी ट्रॅपचे जे आरोप करण्यात आले आहेत, ते खोटे आल्याचे त्या म्हणाल्या. तिला बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. नागपूर पोलिसांकडून योग्य पध्दतीने तपास केला जातो आहे. परंतु आरोपी दिशाभूल करत असल्याचे त्या म्हणाल्या आहेत. सना खान हत्या प्रकरणातील आरोपीना फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
 
सना खान हत्येचा तपास कोणत्या दिशेने ?
 
सना खान हत्या प्रकरणाच्या तपासाला अद्याप पाहिजे तशी गती मिळालेली नाही. सना खानचा मृतदेह आणि मोबाईल अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्यामुळे तपासाला अद्याप दिशाच मिळालेली नाही. या प्रकरणी नागपूर पोलिसांनी मुख्य आरोपी अमित शाहूसह पाच आरोपींना आधीच अटक केली आहे. नागपूर पोलिसांनी संशयितांची चौकशी ही सुरू केली आहे.