नागपूर : ज्येष्ठ गायक पं. विद्याधर व्यास यांच्या स्वरवर्षावाने रसिक श्रोते न्हाऊन निघाले. त्यांच्या सुश्राव्य गायनाने कानसेन तृप्त झाले. त्यांच्या गायकीने रसिकांना अक्षरशः खिळवून ठेवले. ललित कला निधी मुंबई आणि सप्तक नागपूरतर्फे आयोजित द्विदिवसीय गुणीजान समारोहाचे आयोजन आयटी पार्क येथील पर्सिस्टंट सिस्टिमच्या कविकुलगुरू कालिदास सभागृहात करण्यात आले होते. रविवार, 27 रोजी भारतीय संगीताचे अभ्यासक ज्येष्ठ गायक पं. विद्याधर व्यास यांनी आपल्या सुरेल आवाजात कार्यक्रमाचे अंतिम पुष्प गुंफले. पं. विद्याधर व्यास यांचे स्वागत पं. सतीश व्यास यांनी केले.
कार्यक्रमाची सुरुवात त्यांनी ‘तो नु माम धी’ या ‘पूर्वी’ रागातील बंदिशीने केली. पुढे त्यांनी ‘कगवा बोले मोरे अटरिया’ ही बंदीश सादर केली. या मालिकेत पं. व्यास यांनी समयकालीन सर्व रागांची गुंफण अतिशय निटनेटकी केली. याप्रसंगी बोलताना पं व्यास यांनी राग, ताल व आवर्तन या संकल्पना भारतीय संगीताची वैशिष्ट्ये असल्याचे सांगितले.
त्यांना तानपुर्यावर प्रतीक म्हैसेकर व अनिरुद्ध सुर्तेकर यांनी, संवादिनीवर श्रीकांत पिसे, यांनी तर तबल्यावर नागपूरचे संदेश पोपटकर यांनी उत्तम साथ दिली. कार्यक्रमाला पर्सिस्टंट सिस्टीम, थिंक फिन्सर्व आणि आयसीआयसीआय प्रॅुडेन्शियल म्युच्युअल फंडचे विशेष सहकार्य लाभत आहे. या सुमधुर गायनाचा रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मनमुराद आनंद लुटला. कार्यक्रमाचे निवेदन व आभारप्रदर्शन डॉ. उदय गुप्ते यांनी केले. महाराष्ट्र ललित कला निधी मुंबईचे संस्थापक प्रसिद्ध संतुरवादक पं. सतीश व्यास यांची कार्यक्रमाला विशेष उपस्थिती होती.