मुंबई :
मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव (Veteran Actress Seema Dev) यांचे गुरुवारी सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले आहे. वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. वांद्रे येथील राहत्या घरी गुरुवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास सीमा देव यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे देव कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून सिनेसृष्टीचेही मोठे नुकसान झाले आहे. सीमा देव यांच्या निधनामुळे मनोरंजन, राजकीय क्षेत्रासह सर्व स्तरावरून हळहळ व्यक्त होते आहे.
गेल्या तीन वर्षांपासून सीमा देव या अल्झायमर नावाच्या गंभीर आजाराने त्रस्त होत्या. आज सकाळी मात्र त्यांची या आजाराशी झुंज संपली. त्यांचा मुलगा अजिंक्य देव यांनी सोशल मीडियावर याबाबत माहिती देताना सांगितले होते की- 'त्यांची आई सीमा देव अल्झायमरने त्रस्त आहे. आमचे संपूर्ण देव कुटुंब तिची काळजी घेत आहे आणि तिच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहे. तुम्ही देखील प्रार्थना करा.' मात्र, आज सीमा देव यांची प्राणज्योत मालवली.
सीमा देव या अभिनेते रमेश दुबे यांच्या पत्नी आणि दिग्दर्शक अभिनय देव यांच्या आई होत्या. इतकेच नाही तर त्यांचा धाकटा मुलगा अजिंक्य देव हाही चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कलाकार आहे. मराठी चित्रपटांव्यतिरिक्त सीमा देव यांनी अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये आपल्या अप्रतिम अभिनयाने सर्वांची मने जिंकली.
८० हून अधिक चित्रपटांमध्ये केले काम
सीमा देव या मराठी चित्रपटसृष्टीतील एक मोठा चेहरा मानल्या जात होत्या. आपल्या चित्रपट कारकिर्दीत सीमा देव यांनी मराठी आणि अनेक हिंदी चित्रपटांसह ८० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. याशिवाय त्या अनेक टीव्ही मालिकांमध्येही दिसल्या होत्या. १९६० मध्ये 'मिया बीवी रझा' या मराठी चित्रपटातून त्यांनी आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. यानंतर सीमाने राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांच्या 'आनंद' या सुपरहिट चित्रपटातही महत्त्वाची भूमिका साकारली होती.