आज श्रावण महिन्यातील पहिला सोमवार. श्रावण महिन्यातील सोमवार हिंदू धर्मात पवित्र मानला जातो. यादिवशी महादेवाची पूजा केली जाते. तसेच श्रावण महिन्यातील प्रत्येक वारी कोणत्या ना कोणत्या देवतेची पूजा आणि व्रत करण्याची हिंदू व जैन धर्माची परंपरा आहे. श्रावण महिन्याला सर्व सणांचा राजा म्हटले जाते. या महिन्यात व्रत वैकल्यांची रेलचेल असते. श्रावण महिन्यात नागपंचमी, रक्षाबंधन, नारळीपौर्णिमा, श्रीकृष्ण जन्माष्टमी, गोपाळकाला हे सण येतात. त्यानंतर येणारे गौरी गणपतीही याच महिन्यात खुणावत असतात.
नागपंचमी पासून नवरात्र दिवाळी या सगळ्या हव्याहव्याशा सणांची सुरुवात याच महिन्यापासून होते. श्रावण महिन्यातील सर्व सणांच्या दिवशी घराघरात गोडाधोडाचा बेत असतो. श्रावणातील प्रत्येक दिवस सण होऊन जातो. अशा आनंदी वातावरणामुळेच असेल कदाचित पण श्रावणात मनाच्या सांदी कोपऱ्यात उत्साहाचे नवे ऋतू फुलत असतात.
बहुतेक सगळ्या सणांमध्ये आणि अंगिकारल्या जाणाऱ्या व्रत वैकल्यांमध्ये येणाऱ्या संकटांतून निर्भीड आणि यशस्वीपणे बाहेर येण्यासाठी, शक्ती मिळवण्यासाठी प्रेरणा मिळते. संसारातील सुख दुःखाचा सारीपाट मांडला असताना मन मोकळे करून सख्यांना समजून घेण्याचे हक्काचे क्षण हा महिना देऊन जातो. तीन वर्षांपूर्वी संपुर्ण जगावर कोरोनारुपी महामारीचे संकट आले होते. त्या संकटाची छाया श्रावण महिन्यावर देखील पडल्याने जवळपास दोन वर्षे श्रावण महिन्यातील सण धुमधडाक्यात साजरे करता आले नाहीत. या काळात लोकांनी घरीच साधेपणाने श्रावण महिन्यातील सण साजरे केले. हिंदूंप्रमाणेच अन्य धर्मियांच्या सणांवर देखील बंधने आली होती. बंधने असूनही लोकांचा सण उत्सव साजरा करण्यातील उत्साह तसूभरही कमी झालेला नव्हता. आता सुदैवाने कोरोना हद्दपार झाल्याने भाविक पुन्हा एकदा सर्व सण उत्सव उत्साहाने आणि धुमधडाक्यात साजरे करत आहेत.
या वर्षातील श्रावण महिन्यातील उत्साह तर काही औरच आहे. कारण या महिन्यात एक नव्हे तर दोन श्रावण महिने आले आहेत. अधिक श्रावण महिन्याची नुकतीच सांगता झाली. आता निज श्रावण महिन्याला प्रारंभ झाला आहे. अधिक श्रावण महिनाही अनेकांनी धुमधडाक्यात साजरा केला. या महिन्यात आलेले सगळे सणही मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. अधिक श्रावण महिन्यात जावयांचा थाट तर पाहण्यासारखा असतो. अधिक श्रावण महिन्यात सासुरवाडीकडून जावयाला धोंडे जेवणाचे आमंत्रण असते. यावेळी धोंडे जेवणासोबतच जावयाचा योग्य तो मानपान केला जातो.
अधिक श्रावण प्रमाणेच निज श्रावण महिन्यातही तोच उत्साह आहे. नेहमीप्रमाणेच श्रावण महिन्यात हिरवाई नटली आहे. निसर्ग आषाढ सरी पिऊन हिरवे गालिचे पसरून बहरला आहे. हा हिरवा गालिचा पाहूनच बालकवींना जिकडे तिकडे हिरवेगार गालिचे... हरित तृणाचा मखमालीवर... ही कविता सुचली असेल. सगळीकडे वसुंधरेवर श्रावणाच्या धारा बरसत आहेत. श्रावणाच्या धारा बरसत असल्याने निसर्ग सौंदर्य तृप्तीचा हुंकार देत आहे. श्रावणात निसर्गाचे बहरलेले सौंदर्य पाहताच हासरा, नाचरा, जरासा लाजरा, सुंदर साजीरा श्रावण आला या ओळी ओठी गुणगुणाव्याशा वाटतात. श्रावण म्हणजे चैतन्य... श्रावण म्हणजे आनंद... श्रावण म्हणजे उत्साह... श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे... क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरून ऊन पडे... या कवितेत बालकवींनी यथार्थपणे मांडले आहे.
श्याम बसप्पा ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५
*Disclaimer : ब्लॉग हे स्वतंत्र व्यासपीठ आहे. त्यामुळे यात मांडले गेलेले विचार हे लेखकाचे आहेत.