प्रयागराज : आज सातवा श्रावण सोमवार आणि नागपंचमी असून संपूर्ण देशभरात भक्तिमय वातावरण आहे. देशभरातील मंदिरांमध्ये भगवान शिव आणि नागाची पूजा करण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील प्राचीन नाग वासुकी मंदिरात देखील सोमवारी सातव्या 'श्रावण सोमवार' निमित्त भगवान शिव आणि नाग वासुकीची पूजा करण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. प्रयागराजमधील नागवासुकी मंदिराबाहेर आज सकाळपासूनच भाविकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या.
मंदिराच्या प्रवेशद्वारावर भगवान शिव आणि नाग वासुकी यांचा आशीर्वाद घेण्यासाठी पहाटेपासूनच भाविकांनी रांगा लावल्या होत्या. याप्रसंगी बोलताना नाग वासुकी मंदिराचे मुख्य पुजारी श्याम धर म्हणाले, 'नागपंचमीला सनातन धर्मात खूप महत्त्व आहे. आजपासूनच सर्व सण आणि उत्सव सुरू होतील.
नागपंचमीच्या दिवशी सनातन धर्मात नागाची देवताम्हणून पूजा केली जाते. नागांचा राजा नागवासुकीचे मंदिर प्रयागराजमध्ये गंगेच्या काठावर आहे. या दिवशी मोठ्या संख्येने लोक येथे दर्शन करण्यासाठी येतात आणि त्यांच्या कुटुंबासाठी प्रार्थना करतात, असे पुजारी म्हणाले. सनातन धर्मात सापाचाही पर्यावरणाशी संबंध असल्याचे दिसून येते. असे मानले जाते की कोब्रा, भात पिकाच्या संरक्षणासाठी महत्वाची भूमिका बजावतो, कारण तो उंदीर मारतो. निसर्गाने समृद्ध केलेल्या वस्तू या दिवशी नागदेवतेला अर्पण केल्या जातात, असे ते म्हणाले.
दरम्यान, अयोध्येतील शेष अवतार लक्ष्मण मंदिरात भाविकांनी 'नाग देवता' किंवा नाग देवतेची पूजा केली. या दिवशी दूरदूरवरून भाविक येतात आणि भगवान लक्ष्मणाला पाणी, दूध आणि कच्चा हरभरा अर्पण करतात. नागपंचमीचा सण, जो आज साजरा केला जात आहे, हा एक वार्षिक उत्सव आहे जेथे हिंदू नागांची पूजा करतात. नागदेवतेला दूध अर्पण करणे हा या सणाचा मुख्य विधी आहे.