भीषण वास्तवावर भाष्य करणारे 'हंडाभर चांदण्या' आणि 'तो राजहंस एक'

    01-Aug-2023
Total Views |
  • विदर्भ साहित्य संघातर्फे मनोहर म्हैसाळकर स्मृती एकांकिका महोत्सवाला सुरुवात
  • रसिक प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद
Nagpur ACT - Abhijeet Bharat 
नागपूर : खेड्यांमध्ये पाण्याचा दुष्काळ आणि पाणी पुरवठ्याची भीषण परिस्थिति यावर 'हंडाभर चांदण्या' मध्ये, तर तरुण शेकऱ्यांच्या पिढीला टोचणारे प्रश्न यावर 'तो राजहंस एक' मध्ये वास्तववादी भाष्य करण्यात आले आहे. विदर्भ साहित्य संघाचे दिवंगत अध्यक्ष कै. मनोहर म्हैसाळकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ संस्थेतर्फे ३१ जुलै आणि १ ऑगस्ट अशा दोन दिवशी एकांकिका महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. लक्ष्मीनगरातील सायंटिफिक सोसायटीच्या नाट्यगृहात सोमवारी 'हंडाभर चांदण्या' आणि 'तो राजहंस एक' या दीर्घ एकांकिकेचे सादरीकरण करण्यात आले.
 
नाशिक येथील सोशल नेटवर्किंग फोरम या संस्थेने निर्मिलेल्या 'हंडाभर चांदण्या' एकांकिकेचे लेखक दत्ता पाटील असून दिग्दर्शक सचिन शिंदे आहेत. 'हंडाभर चांदण्या' या एकांकिकेमध्ये दुष्काळी गावातील पाण्याच्या समस्येची मांडणी उत्कृष्ट संवादाच्या जोडीने करण्यात आली आहे. 'सूर्याला सोन्याचा गोळा' असे संबोधून म्हटलेले लोकगीत, 'जे आपण विचार करतो ते गीतेमध्ये आधीच लिहले असते' अशा संवादांवर खूप टाळ्या वाजल्या. 'मावळवाडी' हे शे-दोनशे घरांचे गाव. गावात पाण्याचा कायम दुष्काळ. हंडाभर पाण्यासाठी अनेक मैलांची पायपीट करावी लागते. या परिस्थितीने वैतागून जाऊन गावातीलच एक तरुण 'संभा' हा शासन आणि प्रशासनाकडे अनेक तक्रारी करतो. शेवटी तो अधिकारी बाईंना पळवून आणतो. त्यानंतर त्या अधिकारी देखील त्या खेड्यातील परिस्थिति अनुभवतात. प्राजक्त देशमुख, प्रणव प्रभाकर, दीप्ती चंद्रात्रे, नुपूर सावजी, अरूण इंगळे, राजेंद्र उगले, उर्वराज गायकवाड, धनंजय गोसावी, राहुल गायकवाड अशा एकूण नऊ कलावंतांच्या यात भूमिका आहेत. कलाकरांनी भूमिकेला न्याय देत हृदयस्पर्शी आणि वास्तववादी भूमिका सकारल्या आहेत. 'हंडाभर चांदण्या' दीघांकाला नाट्य निर्माता संघ पुरस्कारासह १५ पुरस्कार प्राप्त झालेले आहेत, हे विशेष. या नाटकाच्या प्रस्तुतीला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली.
 
Nagpur ACT - Abhijeet Bharat 
नाशिकच्या याच ग्रुपने निर्मिलेला दुसरा दीघांक 'तो राजहंस एक' सादर करण्यात आला. शेतकऱ्यांना मुली लग्नाला नकार देतात, त्यांना असलेला ताण-तणाव या आणि अशा विविध पैलू यावरुन शेतकऱ्याच्या मानसिकतेचा वेध घेणारी ही एकांकिका होती. सध्याच्या समाजरचनेत आणि जगण्याच्या चौकटीत; विशेषतः ग्रामीण भागातील वातावरणात, एका असह्य टोचणीला शेतकऱ्यांच्या नव्या पिढीला सामोरे जावे लागते आहे. एका बाजूला जगण्याचा तोल सांभाळणे आणि दुसऱ्या बाजूला आपल्याच मनाने बंड पुकारणे अशी ही अवस्था यात कलाकरांनी उत्तम साकारली आहे. भाषा, वेशभूषा, प्रसंग, संवाद हे या एकांकिकेचे विशेष पैलू होते. एका बाजूला निर्मितीचा ध्यास आणि दुसऱ्या बाजूला शेकडो समस्यांना सामोरे जाणे, ही तारेवरची कसरत करताना तरुण शेतकरी थकून जातो, हे वास्तव प्रभावीपणे यातून दिसून येते.
 
गेल्या काही वर्षात मनः स्वाथ्य हरवणे, मानसिक आजार असणे या समस्या वाढल्या आहेत. त्यावरही इथे भाष्य आहे. अशी ही कथा दत्ता पाटील यांच्या लेखणीतून उतरलेली आहे. सचिन शिंदे यांनी तिला रंगमंचावर फुलविले आहे. मानसिक स्वास्थ्यासारख्या एका महत्त्वाच्या विषयाला हात घालणारा हा दीघांक आहे. साहित्य अकादमीच्या युवा पुरस्काराने गौरविण्यात आलेले प्राजक्त देशमुख यांची या दीर्घाकात प्रमुख भूमिका आहे. त्यांच्यासोबत अमेय बर्वे, धनंजय गोसावी, हेमंत महाजन आणि अनिता दाते यांच्या भूमिका आहेत.
 
मोठ्या संख्येने उपस्थित राहून नाट्यरसिकांनी महोत्सवाला उदंड प्रतिसाद दिला. आज नाट्यगंध निर्मित 'प्रस्थान उर्फ एग्झिट' या एकांकिकेने महोत्सवाचा समारोप होणार आहे.