(Image Source : Internet/ Representative)पावसाची रिमझिम सुरू झाली की लगेच रानभाज्याही बाजारात विकण्यासाठी येऊ लागतात. या रानभाज्यांच्या चवीची आणि औषधी गुणधर्मांची जाण असलेले त्यांच्याकडे पाठ फिरवत नाहीत. अत्यंत आवडीने या रानभाज्या बनवून खाल्ल्या जातात. आरोग्यवर्धक, शक्तिवर्धक, त्रिदोषहारक रानभाज्यांचे अनेक फायदे आहेत. रानभाज्यांचे महत्त्व लक्षात यावे यासाठी रानभाज्यांचे उत्सवही साजरे केले जात आहेत. कुपोषणमुक्तीमध्ये या भाज्यांमधील घटकद्रव्यांचा आवर्जून विचार करायला हवा, हा आग्रहही वाढता आहे. भाज्या अतिशय पौष्टिक असतात. आरोग्य वर्धक आणि बहुगुणी असतात. यात कार्बोहायड्रेट, प्रोटिन, सॅपोजेनिन, सॅपोनिन सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियमचे प्रमाण अधिक असते.
पुरातन काळापासून अनेक रानभाज्या आवडीने शिजविल्या व खाल्ल्या जातात. पुर्वी पावसाळ्याचे दिवस गावातील लोकांसाठी अतिशय कसोटीचे दिवस असत. अशा परिसरात अगदी मुबलक व फुकट मिळणाऱ्या रानभाज्या शिजवून येथील लोकांचा उदरनिर्वाह चालत असे. या सर्व रानभाज्या औषधी गुणांनी युक्त असल्याने येथील लोकांचे आरोग्यही चांगले राहत असे.
कुर्डू
कुर्डूची भाजी पावसाळ्याच्या सुरुवातीला शेताचे बांध, पायवाट, मोकळी व पडीक जमीन, जंगल अशा ठिकाणी आपोआप रुजते. कुर्डुची रानभाजी कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात सर्वत्र आढळते. माठवर्गीय कुळात मोडणारी ही अतिशय रुचकर व बहुऔषधी गुणांनी युक्त रानभाजी आहे. बारीक व तांबूस खोडाला गोलाकार आकाराची पाने येतात. ही रानभाजी कोवळी असताना खाण्यातच खरी मजा असते. कुर्डूच्या कोवळ्या पानांचे तुरे भाजीसाठी वापरतात.
फोडशी
ही कांदावर्गीय रानभाजी आहे. पांढऱ्या कांद्याच्या भाजीसारखीच ही भाजी असते व दिसते. बऱ्याच वेळेस ही भाजी उपटताता कांदा जमिनीतच राहतो. पावसाळ्याच्या अगदी सुरुवातीस ही भाजी जंगलात उगवते.
अळू (तेरी)
पावसाळ्यात आवडीने खाल्ली जाणारी ही लोकप्रिय रानभाजी आहे. उन्हाळ्यात निद्रिस्त असलेल्या तेरीच्या जमिनीत असलेल्या कांदेवजा गुठळ्यांना पावसाळ्याच्या सुरुवातीला कोंब येतात. कोंब जमिनीबाहेर आले की पहिले पान उगवते. गोलाकार आकाराचे लांब देठाला आलेले पान हिरवट काळसर व छान नक्षीयुक्त असते. हे पहिले पान खुडून आणल्यावर स्वच्छ धुतात. कोकणात सर्वत्र सहज उपलब्ध होणारी ही रानभाजी आहे.
शेवळं
ही भाजी पावसाळ्याच्या सुरुवातीला मिळते. ही भाजी घशाला खवखवते त्यामुळे विशिष्ट पद्धतीने बनवली जाते. पण, यात मूत्राशयाचे आजार बरे करण्याची ताकद असते. शेवळांची भाजी किंवा वडीही बनवतात.
टाकळा
टाकळ्याची भाजी उष्ण असते. त्यामुळे वात आणि कफदोष कमी होतो. तुरट चवीची ही भाजी मेथीच्या भाजी प्रमाणे बनवता येते. या भाजीने पोट साफ होतं शिवाय त्वचारोग होण्याचा धोका कमी असतो.
करटोली-काटवल
थोडीशी कडवट चवीची ही भाजी यकृतासाठी उपयोगी आहे. पोट साफ होतं आणि मुळव्याधासारखा त्रासही कमी करते. थोडी काटेरी कारल्या सारखी दिसते.
तादूंळजा किंवा रानमाठ
जसा चवळी माठ असतो, तशीच ही माठाची भाजी दिसते. थोडी चिकट असणारी ही भाजी, श्रावण महिन्यातील सणात नैवेद्य दाखवण्यासाठी केली जाते. काही लोक याच भाजीला माठलाही म्हणतात.
पावटा
ही भाजी बाजारात मिळत नाही पण, घरीच उगवता येते. त्यासाठी गावठी वाल भिजत घालावेत, त्यांना मोड आल्यावर पानं फुटेपर्यंत तसेच ठेवावेत. अगदी हिरवी पानं आली की मेथीच्या भाजी प्रमाणे बनवावेत. पावसाळ्यातच असे मोड येतात. याला वालाचे स्प्राऊट म्हणता येईल.
रान कंद
पावसाळ्यात मिळणारे करांदे आवडीने खाल्ले जातात. कापलेले करांदे राखेत घोळवून पळसाच्या पानात शिजवतात. शिवाय पाऊस कमी झाला की, रताळे, करांदे, कोळू, चाई, कणंक यात व्हिटॅमीन ए, बी5,बी 6, थायमिन, नायसिन, रिबोफलाविन, कॅरोनाईट्स असतं. हे घटक कॅन्सर सारख्या आजाराला दूर ठेवातात.
घोळ
ही रानभाजी असली तरी जंगल परिसराप्रमाणेच शेतातही आढळते. शेतात, शेताच्या बांधावर ओलसर जागेत ही रानभाजी आपोआप रुजते. बारीक गोलाकार व फुगीर पाने असलेले हे रोपटेवजा छोटेसे झाड असते. एकाच मुळाला अनेक फांद्या फुटून त्या जमिनीलगत पसरत व वाढत जातात. घोळीच्या फांद्या खुडून त्यांची पाने शेवग्याच्या टाळ्यांप्रमाणे ओरबाडून घेतात.
कोणती काळजी घ्यायची?
रानभाज्यांबद्दल पुरेशी माहिती नसल्यामुळे इच्छा असूनही अनेकांकडून त्या विकत घेतल्या जात नाहीत. त्यामुळे रानभाज्या विकत घेताना शक्यतो स्थानिक आदिवासींकडून त्या घ्याव्यात. त्यांच्याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. त्यांना या भाज्यांविषयी जास्त अचूक माहिती असते. ज्या भाज्यांमध्ये पानांचा समावेश अधिक आहे. या भाज्या विकत घेतल्यानंतर त्या गरम पाण्यात उकळून ते पाणी टाकून द्यावे, त्यानंतरच या बनवाव्यात. या प्रक्रियेमुळे रानभाज्यांमधील अंगभूत गुणधर्म कमी होत नाहीत. या भाज्या नैसर्गिक पद्धतीने वाढवलेल्या असतात त्यामुळे त्यात खतेही वापरलेली नसतात. उकडून भाज्या केल्यानंतरही त्यातील गुणधर्म कमी होत नाही. उकडून केलेल्या भाज्यांमध्ये शक्यतो कमी मसाले वा तेलाचा वापर केल्यामुळे त्या आरोग्यासाठी पोषक ठरतात.
पावसाळ्यातील रानभाज्या ही निसर्गाची अनमोल देणगी आहे. बहुसंख्य रानभाज्या आरोग्यास हितकारक व विविध विकारांवर गुणकारी आहेत. याशिवाय या सर्व रानभाज्या सहज उपलब्ध होणाऱ्या आहेत. कोणत्याही रासायनिक खताशिवाय वाढलेल्या अशा नैसर्गिक रानभाज्या आपण स्वतः आणि परिवार सोबत पावसाळ्यात अवश्य खायला हव्यात.
प्रणव सातोकर,
नागपूर
9561442605