- श्री गुरु चरित्र ग्रंथाचे ११ चक्रीपारायणे आध्यात्मिक उपक्रमाचे यशस्वी आयोजन
नागपूर : ज्ञान, कर्म आणि भक्ती यांचा त्रिवेणी संगम ज्या ठिकाणी झालेला आहे, असा दिव्य ग्रंथ श्री गुरु चरित्र असून हा ग्रंथ प्रपंच आणि परमार्थ अशा दोन्हीचे फळ देणारा असल्याचे प्रतिपादन धर्मभास्कर प.पू. सद्गुरूदास महाराज यांनी केले. मंगला देवी संस्थान, अध्यात्म ज्ञानोपासक मंडळ व प.पू. विष्णुदास स्वामी महाराज अध्यात्म साधना कर्वेनगर व रेशिमबाग, अमरावती, लाखनी, भंडारा, आर्वी व महाल केंद्रातील भक्तांनी श्री गुरु चरित्र ग्रंथाचे ११ चक्रीपारायणे अध्यात्मिक उपक्रम आयोजिण्यात आला त्यानंतर उपस्थित उपासकांना उद्बोधन करताना ते बोलत होते.
गुरु हा परमोच्चस्थानी असून गुरु आज्ञांचे पालन केले की, त्याची फलश्रुती निश्चित दिसते असे महाराज म्हणाले. डॉक्टर गोळी देतात तेव्हा त्याची उकल करून त्यात नेमके काय आहे हे आपण शोधून पाहत नाही कारण त्यांच्या चिकित्सा पद्धतीवर आपला विश्वास असतो, त्याच प्रमाणे विश्वास आणि एकाग्रतेने गुरुचे पूजन, अनु त्यांच्या उपदेशांचे अनुकरण केल्यास आपल्याला त्याचा लाभ होतो असे महाराज म्हणाले. श्री गुरु चरित्राचे मनोभावे वाचन आणि पारायण केल्यास साक्षात नृसिह सरस्वती यांचा कृपाप्रसाद त्यांना मिळतो आणि त्यांचा इहलोक आणि परलोक सार्थकी ठरतो असे ते पुढे बोलताना म्हणाले.
तत्पूर्वी, आज सकाळी ५.३० वाजता श्री मंगलादेवी संस्थान परिसरात श्री भगवती मंगला देवीस व सद्गुरू स्वामी शिलानंद सरस्वती महाराजांना श्री सुक्त व रूद्र पठणाने अभिषेक करण्यात आला. सकाळी ९ ते १२ दरम्यान श्री मंगला देवी संस्थान, अध्यात्म ज्ञानोपासक मंडळ व प.पू. विष्णुदास स्वामी महाराज अध्यात्म साधना कर्वेनगर व रेशिमबाग, अमरावती, लाखनी, भंडारा, आर्वी व महाल केंद्रातील भक्तांनी श्री गुरु चरित्र ग्रंथाचे ११ चक्रीपारायणे पूर्ण केलीत. दुपारी १२ वाजता महाआरती झाली. दुपारी ४ वाजता धर्मभास्कर प.पू. सद्गुरूदास महाराज यांचे आगमन मंदिरात झाले. मंगला देवी संस्थान तर्फे विश्वस्तांनी यथोचित त्यांचे पाद्यपूजन केले व सत्कार केला.
प्रास्ताविक मंगला देवी संस्थान चे पुजारी श्री मोहन देव यांनी केले. संस्थान चे अध्यक्ष प्रभाकर खानझोडे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी संस्थान चे सचिव रवींद्र देशपांडे व इतर विष्वस्तांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मंगरूळ दस्तगीर मधील नागरिक, गुरुं मंदिराचे विविध केंद्रातून आलेले उपासक प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रतिमा तुंगार यांनी केले. पू. महाराज यांचा परिचय भाग्यश्री कांत यांनी करून दिला. श्री गुरु मंदिरची माहिती संजय देशकर यांनी दिली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंगला देवी संस्थानचे सर्व विश्वस्त, पुजारी, नागरिक, गुरूमंदिर परिवाराचे उपासक यांनी सहकार्य केले.