उडुपी..! महाभारत युद्धाचे अन्नछत्र...!

    09-Jun-2023
Total Views |

Udupi - Abhijeet Bharat
 
अरबी समुद्रा किनार्‍यावर वसलेल्या दक्षिण भारताचा कर्नाटक मधील ‘उडुपी’ हा जिल्हा नारळांच्या झाडांच्या आणि विशाल समुद्री लाटांच्या अपार निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. कर्नाटकला भारताच्या दक्षिण दिशेचे प्रवेशद्वार म्हटल्या जाते. कर्नाटक हा शब्द मुळच्या ‘कुरूनाड’ पासून आलेला आहे. ‘कुरूनाड’ म्हणजे “भव्य उच्च भूमी”..! आजही अनेक पौराणिक मंदिरांचे आणि प्राचीन ऐतिहासिक वारशांचे जतन कर्नाटकच्या संस्कृतीत बघायला मिळते. म्हणूनच ‘कुरूनाड’ हे प्राचीन नाव “भव्य उच्च भूमी” म्हणून सार्थक झाल्यासारखे वाटते. याच कुरूनाडचा अपभ्रंश म्हणजे आजचे कर्नाटक...!
 
चिकमंगलूर पासून बसने खालच्या भागाला उतरल्यावर चार साडेचार तासातच मणिपाल हे सुंदर ठिकाण लागते.. येथूनच पुढे सहा सात किलोमिटर अंतरावर असलेल्या “उडुपी” या सर्वांग सुंदर शहरात प्रवेश होतो. कर्नाटकच्या धार्मिक आस्थेचे ‘उडुपी’ हे फार मोठे केंद्र आहे.
 
उडुपी शहराचा फेरफटका मारला तर जुन्या काळातल्या अनेक प्राचीन वास्तू आणि अनेक मंदिरे दिसायला लागतात. यात सातव्या शतकातले महिषामर्दिनी मंदिर, हेबरी येथे असलेले अनंतपद्मनाभ मंदिर, पद्मदुर्गा परमेश्वरी मंदिर, जनार्धन आणि महाकाली मंदिर, लक्ष्मी व्यंकटेश मंदिर, अनेगुड्डे विनायक मंदिर, मुख्य कृष्ण मंदीरा समोरच असलेले चंद्रमौलिश्वराचे मंदिर अशी अनेक मंदिरे कृष्णमंदिरा सभोवताली आहेत. त्यामुळे येथे कायमचीच भक्तांची आणि पर्यटकांची मांदियाळी बघायला मिळते. साधू संतांच्या अनेक मठांचे दर्शन होते. त्यात प्रवेश करून अनेक स्वामी, आणि गुरूंच्या चरण स्पर्शाचे आणि त्यांचा आशीर्वाद घेण्याचे सौभाग्य लाभते.
 
उडुपी शहराच्या मध्यभागी वसलेले आहे. १३ व्या शतकात बांधलेले प्राचीन कृष्णमंदिर मंदिर हे उडुपीचे सर्वात मोठे आकर्षण आहे. दक्षिण भारतातले हे प्रमुख ‘भक्तीकेंद्र’ आहे. भारताच्याच नव्हे तर जगातल्या अनेक भागातून दर्शनाकरिता आणि माल्पेच्या समुद्री पर्यटनाचा आनंद लुटण्याकरिता पर्यटक येथे येत असतात. उडुपीतील कृष्णाचे मंदिर हे अतिशय प्रसिद्ध आहे. वैष्णव संप्रदायातील मध्वाचार्यांनी या मंदिराची निर्मिती आणि कृष्ण प्रतिमेची स्थापना तेराव्या शतकात केली. मध्वाचार्यांचा जन्म उडुपीच्या ‘पजाकाक्षेत्र’ नावाच्या लहान गावात झालेला असून त्यांचे राहते आंगण असलेले सुंदर कौलारू घर आजही ८-१० किमी अंतरावर बघायला मिळते. त्यांच्या पावलांच्या ठशांचे दर्शन या झोपडीवजा घरात होते. हे घर सुद्धा उडुपीचे प्रमुख आकर्षण आहे. त्यांनी दक्षिण व उत्तर भारत यात्रेहून उडुपीस परत आल्यावर तेथे श्रीकृष्णाच्या प्रतिमेची स्थापना केली. मध्वाचार्यांची तीव्र इच्छा होती की, द्वारकेचे श्रीकृष्ण उडुपीत यावेत. उडुपीच्या तटावरच्या अरबी समुद्रावर द्वारकेच्या दिशेने ते दररोज श्रीकृष्णाचे जपतप करीत. उडुपी ही श्री मध्वाचार्यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी राहिली आहे. श्रीकृष्णाची हातात रवी धरलेली सुंदर मूर्ती मध्वाचार्यांना बुडत्या समुद्री जहाजाच्या गोपीचंदनाच्या ढेपळ्यात सापडलेली आहे. आपल्या दैवी सामर्थ्याने त्यांनी हे जहाज बुडण्यापासून वाचविले .त्याच श्रीकृष्णाच्या मूर्तीची त्यांनी येथे स्थापना केली. भारतात तिरुपती हे ‘कांस्यब्रह्म’ आहे, पंढरपूर ‘नादब्रह्म’ आहे’ तसेच उडुपी हे क्षेत्र ‘अन्नब्रह्म’ आहे.
 
उडुपी हे कृष्णमंदिराच्या सभोवताली असलेल्या अष्टमठांसाठी प्रसिद्ध आहे. प्रसिद्ध पेजावर मठ येथेच आहे. या मठात जाण्याची आणि स्वामींच्या दर्शनाची संधि आम्हाला मिळाली. भव्यदिव्य कृष्णमंदिर काहीसे आत आहे. या मंदिराचे प्रवेशद्वार अतिशय विशाल आहे. अनेक देवतांच्या मूर्तीने आणि कलात्मकतेने हे प्रवेशद्वार सजलेले आहे. येथील वैशिष्ट्य असे की, मूर्तीला कुणालाच स्पर्श करता येत नाही आणि मूर्ती पर्यंत जाता येत नाही. नऊ खिडक्या असलेल्या “नवग्रह खिडकीतून”च दर्शन घ्यावे लागते. काहीशी बंदिस्त अशी ही कृष्ण मूर्ती आहे.
 

Udupi 
 
याच भगवान श्रीकृष्णाने महाभारताच्या युद्धात मध्यवर्ती भुमिका साकारलेली आहे. ब्रम्हांडामध्ये सर्वात मोठे युद्ध जर कोणते झाले असेल तर ते महाभारताचे युद्ध आहे...! हे महायुद्ध आता टळण्याच्या परिस्थितीत नव्हते. विवश परिस्थितीत या युद्धात कुठल्याही राजाला अलिप्त राहणे अशक्य होते. कौरव आणि पांडवांनी जसे भारतातल्या अनेक राजांना आपल्या बाजूने लढण्याचे आवाहन केले. तसेच उडुपीच्या राजाला पण आपल्या बाजूने लढण्याचे आवाहन केले. अनेक राजे कुणाकडून लढावे या संभ्रमात गोंधलेले होते. अत्यंत शांतीप्रिय असलेला उडुपीचा राजा सुद्धा गोंधळलेला होता. तो कृष्णाचा परममित्र आणि सखा होता. तरीही एकाच रक्ताच्या असलेल्या दोन भावांच्या कुटुंबामध्ये युद्ध होऊ नये, असे त्याला प्रामाणिक पणे वाटत होते. पण कुठल्याही एका पक्षाकडून लढावे लागणारच होते. म्हणून हजारो सैनिकांसोबत तो कुरुक्षेत्राकडे निघाला. श्रीकृष्णाची स्वतःची ‘नारायणी यादव सेना’ ही कौरवांच्या बाजूने लढत होती. तर भगवान श्रीकृष्ण हे पांडवांच्या बाजूने लढत होते. आपली व्यथा उडुपीच्या राजाने श्रीकृष्णाला सांगितली आणि विचारले “भगवंता ..! तूच सांग मी कुणाकडून लढावे..? या युद्धात माझी कुणाचं कडून लढायचीच इच्छा नाही.. मला तटस्थ राहायचे आहे ”.. भगवान म्हणाले “ठीक आहे ..! पण तू आणि तुझी सेना या युद्धापासून अलिप्त राहून दोन्ही पक्षांच्या सैन्याकरिता युद्धभूमीवर दोन्ही वेळच्या जेवण्याची व्यवस्था कर..! त्यांना खाऊन पिऊन तृप्त कर..! ही जबाबदारी तू स्वीकार. म्हणजे तुला युद्धापासून अलिप्तही राहता येईल आणि युद्ध भूमीत समावेशही करता येईल.’’ श्रीकृष्णाचा हा कल्पक सल्ला होता. या करिता उडुपीचा राजा आनंदाने तयार झाला आणि त्याचे सारे सैनिक या कामाला लागले. रोजच्या जेवणाकरिता अनेक निटनेटके विशाल मंडप उभारण्यात आले. अतिस्वच्छता ठेवण्यात आली. लाखो सैनिकांच्या दोन्ही वेळच्या जेवणाची व्यवस्था करणे ही सोपी गोष्ट नव्हती. ही असामान्य बाब होती. पण उडुपीच्या राजाने रात्रंदिवस मेहनत करुन ही प्रचंड मोठी जबाबदारी पार पाडली आणि दर्जेदार, स्वादिष्ट, पौष्टिक आणि पोटभर जेवण प्रत्येक सैनिकाला देऊन तृप्त केले. हे जेवण कधीही कमी पडले नाही, वायाही गेले नाही आणि उरलेही नाही. ही किमया उडुपीच्या राजाने कशी काय साधली? या सर्व अन्नछत्रावर भगवान श्रीकृष्णाचा आशीर्वाद उडुपीच्या राजाला लाभलेला होता. महाभारताच्या या १८ दिवसात रोज हजारो सैनिक मारले जायचे. जेवणाच्या पंगतीत रोज सैनिकांची संख्या कमी कमी व्हायला लागली आणि उडुपीचा राजा नेमका तितक्याच उरलेल्या सैनिकांचे जेवण अचुक पणे तयार करायचा. त्याचा अंदाज कधीच चुकला नाही. त्यामुळे अन्न उरण्याचा आणि वाया जाण्याचा प्रश्नच नव्हता.
 
महाभारत युद्ध संपल्यावर धर्मराज युधिष्ठीराने हस्तिनापूरच्या दरबारात उडुपीच्या राजाचा खूप मानसन्मान करून आणि अंगवस्त्रे प्रदान करून भरपूर बक्षिसे दिलीत आणि विचारले “तुला जेवणाचा इतका अचूक अंदाज कसा काय यायचा? किती सैनिक जेवायला येणार हे तुला अगोदरचा कसे काय कळत होते?” राजा म्हणाला, ही सर्व भगवान श्रीकृष्णाची किमया आहे..! त्यांना भाजलेले/उकडलेले शेंगदाणे खूप आवडतात, हे मला माहीत होते. त्यामुळे रोज रात्री एका भांड्यात मी त्यांना मोजून शेंगदाणे द्यायचो. ते रोज शेंगदाणे खायचे पण कधीच संपवत नव्हते.!काही शेंगदाने नेहमी शिल्लक असायचे. हे शिल्लक असलेले शेंगदाणे म्हणजे जीवंत असलेल्या हजारो पटींचे सैनिक असायचे. त्यामुळे मी नेमके तितक्याच सैनिकांचे जेवण करण्याचे आदेश माझ्या सैन्याला देत होतो. हे गणित कधीच चुकले नाही. त्याच वेळेस तेथे उपस्थित असलेल्या श्रीकृष्णाने उडुपीच्या राजाला आशिर्वाद दिले की तुझ्या राज्यातले लोक जर या जेवणाच्या व्यवसायात पडले आणि लोकांना भरपूर खाऊपिऊ घातले तर तुमची नेहमीच भरभराट होईल. कुटुंबात कधीच काही कमी पडणार नाही असा माझा आशिर्वाद आहे. त्याचाच परिणाम म्हणून उडुपी प्रांतातले लोक शेकडो पिढ्यांपासून परंपरेने उपहारगृहाच्या व्यवसायात गुंतलेले आहे आणि त्यांचे वर्चस्व सिद्ध झालेले दिसते. संपूर्ण भारतातच नव्हे तर जगातल्या प्रमुख शहरात दक्षिण भारतीय “उडुपी हॉटेल” हे त्यांच्या विशिष्ट पदार्थांकरिता आणि चवी करिता कमालीचे लोकप्रिय आणि प्रसिद्ध आहे. इडली, दोसा, सांबरवडा, उत्तपम, रस्सम भात, सांबार, खोबर्‍याची चटणी हे पदार्थ आजही आपल्या सामाजिक जीवनाचा भाग झालेला आहे. हा भगवान श्रीकृष्णाचाच आशिर्वाद आहे असे उडुपीचे लोक मानतात.
 
आजही भगवान श्रीकृष्ण उडुपीच्या घराघरात आणि प्रत्येकाच्या ऋदयात सामावलेला आहे. उडुपी म्हणजे जणूकाही “दुसरे मथुरा”च आहे, असे वाटायला लागते. महाभारताच्या युद्धभूमीत असूनही युद्धात सहभागी न झालेल्या राजाचे हे सर्वांग सुंदर अप्रतिम असलेले कर्नाटकातले लहानसे सुंदर शहर..!‘उडुपी..! महाभारत युद्धाचे अन्नछत्र...!
 
 
श्रीकांत पवनीकर
पर्यटन लेखक, नागपूर
मो- ९४२३६८३२५०
 
 
*Disclaimer : ब्लॉग हे स्वतंत्र व्यासपीठ आहे. त्यामुळे यात मांडले गेलेले विचार हे लेखकाचे आहेत.