मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेला गती द्या; प्रधान सचिव आभा शुक्ला यांचे निर्देश

    09-Jun-2023
Total Views |

Chief Minister Solar Agriculture Channel Scheme
 
 
नागपूर : मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० मुळे (CM Solar Agriculture Channel Scheme) कृषी पंपांना दिवसा नियमित व भरवशाचा वीज पुरवठा मिळणार असून त्यामाध्यमातून विदर्भाच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या या महत्वाकांशी योजनेच्या अंमलबजावणीला नागपूर विभागातील अधिकाऱ्यांनी अधीक गती द्यावी, असे निर्देश प्रधान सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला यांनी विभागीय कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत दिले.
 
कृषी पंपांना दिवसा नियमित व भरवशाचा वीज पुरवठा देणारी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० (मिशन-२०२५) राज्य शासनाने जाहीर केली असून योजनेत ज्या ग्रामीण भागांमध्ये गावठाण व कृषी वीजवाहिन्यांचे विलगीकरण झाले आहे, अशा वीजवाहिन्यांचे सौर ऊर्जीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी सौर प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या योजनेचा नागपूर विभागातील प्रगतीचा आढावा त्यांनी घेतला या सहा जिल्ह्यात एकूण २७७ कृषिप्रवण वीज उपकेंद्रे आहेत. या सहा जिल्ह्यात सौर ऊर्जा प्रकल्पाचे लक्ष्य सुमारे १०३४ मेगावॅट वीज निर्मितीचे असून त्यासाठी एकूण ५१७१ एकर जमीनीची आवश्यकता आहे.त्यासाठी नागपूर विभागातील अधिकाऱ्यांनी जास्तीत-जास्त शासकीय जमीन मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन प्रधान सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला यांनी बैठकीत केले.
 
सौर ऊर्जा प्रकल्पासाठी उपकेंद्रापासून १० किलोमीटर पर्यंतची सरकारी जमीन तर ५ किलोमीटर पर्यंतच्या तसेच रस्त्यालगतच्या खासगी मालकीच्या जमिनीची महावितरणला आवश्यकता आहे. उपलब्ध जमिनीचे कल्स्टर तयार करण्याचे प्रस्तावित असून तसे केल्यामुळे विकासकाला सोयीचे होईल व योजनेला गती मिळेल असे मत प्रधान सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला यांनी यावेळी व्यक्त केले व त्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश दिले. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी समन्वय साधून योजनेसाठी साठी जास्तीत-जास्त जमीन मिळवावी, असेही निर्देश आभा शुक्ला यांनी बैठकीत दिले.
 
या आढावा बैठकीत विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, नागपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर, वर्धेचे जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, गोंदियाचे जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे, भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर व चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा तसेच नागपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सोम्या शर्मा, महावितरणचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी, मुख्य अभियंते दिलीप दोडके, सुनील देशपांडे, पुष्पा चव्हाण बैठकीत उपस्थित होते.