जम्मू-काश्मिरात पहिले व्यंकटेश्वर स्वामी मंदिराचे उद्‌घाटन

08 Jun 2023 18:39:01

New Venkateshwar Swami Mandir - Abhijeet Bharat
 
नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशातील पहिले व्यंकटेश्वर स्वामी मंदिराचे आज उद्‌घाटन करण्यात आले. केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह, केंद्रीय सांस्कृतिक, पर्यटन आणि ईशान्य क्षेत्र विकास मंत्री जी किशन रेड्डी आणि जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी जम्मू येथील व्यंकटेश्वर स्वामी मंदिराचे उद्‌घाटन केले. व्यंकटेशाचे हे देशातील सहावे मंदिर आहे.
 
 
याप्रसंगी बोलताना डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले, जम्मू येथे श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिराची स्थापना हा भारताचा आणि भारताच्या विविधतेतील एकतेचा उत्सव आहे. हे जम्मू-काश्मीरमधील पहिले आणि भारतातील सहावे मंदिर आहे. यामुळे जम्मूला भारतातील अव्वल धार्मिक पर्यटन स्थळ बनवण्याचा मार्ग खुला झाला आहे, असेही ते म्हणाले. 8 जून 2023, जम्मू येथील व्यंकटेश्वर स्वामी मंदिराच्या उद्घाटनाचा हा दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जम्मूच्या विकासाच्या प्रवासामध्‍ये मैलाचा दगड ठरणार आहे, यावर डॉ. जितेंद्र सिंह यांनी भर दिला.
 
डॉ. जितेंद्र सिंह पुढे म्हणाले की, संपूर्ण देश अगदी पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत, उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आता एकत्रित झाला आहे. वाराणसीमध्ये आयोजित 'काशी तमिळ संगमम' आणि जम्मू येथील ' व्यंकटेश्वर स्वामी मंदिर' ही त्याची उत्तम उदाहरणे आहेत. तामिळनाडू आणि काशी, देशातील या दोन सर्वात महत्त्वाच्या आणि प्राचीन काळच्या अध्‍यापनाची स्थाने निवडून तो काळ पुन्हा साजरा करणे, त्याचे समर्थन करणे आणि अगदी जुन्या काळातील दुवे पुन्हा शोधून ते जोडण्‍याच्या उद्देशाने केलेले काम महत्वपूर्ण असल्याचे डॉ. सिंह यांनी नमूद केले.
Powered By Sangraha 9.0