ईट राईट इंडिया चॅलेंज-२ स्पर्धेमध्ये औरंगाबाद शहराला प्रशस्तीपत्र

08 Jun 2023 13:21:15

Eat Right India Challenge-2 - Abhijeet Bharat 
नवी दिल्ली : ईट राईट इंडिया चॅलेंज -2 मध्ये औरंगाबाद शहराला देशपातळीवर उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे बुधवारी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण तसेच रसायने आणि खते मंत्री डॉ. मनसुख मांडविय यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. येथील विज्ञान भवनमध्ये केंद्रीय अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण यांच्यावतीने जागतिक अन्न सुरक्षा दिनाचे औचित्त्य साधून एक दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी केंद्रीय आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री एस.पी. सिंग बघेल, केंद्रीय अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. कमलवर्धन राव, सहसचिव आराधना पटनाईक मंचावर उपस्थित होते. यावेळी ईट राईट इंडिया चॅलेंज -2 मध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शहरांना पुरस्कृत करण्यात आले.
 
राज्यातून औरंगाबाद शहराने उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल प्रशस्तीपत्र प्रदान करून गौरव करण्यात आला. औरंगाबाद शहराचे नोडल अधिकारी तथा सहायक आयुक्त अजित मैत्रे, अन्न सुरक्षा अधिकारी निखिल कुलकर्णी यांनी हे प्रशस्तीपत्र स्वीकारले. केंद्र शासनाच्या अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाने २०२२-२३ मध्ये आयोजित ईट राईट इंडिया चॅलेंज - २ स्पर्धेत औरंगाबाद शहराने उल्लेखनीय कामगिरी करत महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक पटकावला असून देशपातळीवर २८ वा क्रमांक मिळवला आहे.
 
ईट राईट इंडिया चॅलेंज-2 चे असे होते निकष
 
या स्पर्धेत अन्न सुरक्षा व मानके कायद्याच्या अंमलबजावणीचे कामासह ग्राहक जागृती, अन्न व्यावसायिकांचे प्रशिक्षण, ईट राईट कँपस, पदपथावर विक्री होणाऱ्या अन्न पदार्थाच्या दर्जाबाबत हमी आदी निकषावर देशभरातून उत्तम कामगिरी करणाऱ्या शहरांची निवड करण्यात आली. त्यामध्ये औरंगाबाद शहराने बाजी मारली आहे.
 
औरंगाबाद अन्न प्रशासनाने उचलली अशी पाऊले
 
औरंगाबाद अन्न प्रशासन पथकाने या स्पर्धेमध्ये सर्व स्तरावर चांगली कामगिरी केली आहे. दैनंदिन अंमलबजावणी कामकाजामध्ये अन्न परवान्यांची संख्या वाढविणे, अन्न आस्थापना तपासण्या, नियमित व सर्वेक्षण नमुने, अन्न व्यावसायिकांना फॉस्टॅक प्रशिक्षण कामकाज करण्यात आले. अन्न सुरक्षा सप्ताहात शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची प्रभातफेरी, कार्यशाळा, फुड सेफ्टी ऑन व्हील्स यासारखे उपक्रम राबविण्यात आले असल्याचे मैत्रे यांनी सांगितले.
 
शहरातील शहानुरमियां दर्गा चौपाटी, सुतगिरणी चौपाटी या ठिकाणाला क्लिन स्ट्रीट फूड हब चा दर्जा मिळवून दिला. तसेच औरंगपुरा भाजी मंडई या ठिकाणास क्लीन फ्रुट व व्हेजिटेबल मार्केटचा दर्जा बहाल करण्यात आला आहे.
 
औरंगाबाद शहरातील डॉ. हेडगेवार हॉस्पिटल कँटीन, बजाज हॉस्पिटल कँटीन, मेडिकव्हर हॉस्पिटल कँटीन, स्कोडा कंपनी कँटीन, गुड ईयर कंपनी कँटीन, इस्कॉन अन्नामृत फाउंडेशन यांना ईट राईट कँपसचा दर्जा मिळाला आहे. ईट राईट इंडिया चॅलेंज स्पर्धेची प्रसारमाध्यमांनी व्यापक प्रसिद्धी दिल्यामुळे औरंगाबाद शहरातील अन्न व्यावसायिक व नागरिकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवून उत्स्फुर्त प्रतिसाद दिला असल्याचे मैत्रे यांनी माहिती दिली.
 
औरंगाबाद शहराला हा बहुमान मिळवून देण्यासाठी औरंगाबाद शहराचे नोडल अधिकारी तथा सहायक आयुक्त अजित मैत्रे यांचे नेतृत्वाखाली सहायक आयुक्त दयानंद पाटील, अन्न सुरक्षा अधिकारी निखिल कुलकर्णी, संजय चट्टे, सुलक्षणा जाधव, वर्षा रोडे, ज्योत्स्ना जाधव व मेघा फाळके यांनी कामकाज केले असल्याचे श्रेय मैत्रे यांनी सहकार्यांना दिले.
Powered By Sangraha 9.0