भारत बनणार टेस्ट मे बेस्ट?

    07-Jun-2023
Total Views |

India VS Australia - Abhijeet Bharat 
आजपासून म्हणजे ७ जून पासून इंग्लंडच्या ओव्हल मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात विश्व कसोटी चॅम्पियनशिपचा (wtc) अंतिम सामना रंगणार आहे. ही कसोटी जिंकणारा संघ कसोटीत अजिंक्य ठरणार आहे. म्हणजे एकप्रकारे ही कसोटीच्या विश्वचशकाची फायनल आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. या अंतिम कसोटीत पोहोचलेले दोन्ही संघ म्हणजे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांनी मागील वर्षभरात कसोटीत अप्रतिम कामगिरी करत कसोटी क्रमवारीत पहिले व दुसरे स्थान मिळवून अंतिम फेरीत धडक मारली. भारताने सलग दुसऱ्या वर्षी कसोटीच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे.
 
मागील वर्षीही भारताने अंतिम फेरीत स्थान मिळवले होते. मात्र न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारावा लागल्याने कसोटी अजिंक्यपदापासून वंचित राहावे लागले होते. आता यावर्षी तरी भारत ही कसोटी जिंकून कसोटी अजिंक्यपद मिळविल, अशी आशा देशातील १४० कोटी जनतेला आहे.
 
कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचलेले दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. ऑस्ट्रेलियाचा संघ तगडा असला तरी भारताचा संघ काही कमी नाही. फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही क्षेत्रात भारतीय संघ मजबूत आहे. भारताची फलंदाजी विश्वस्तरीय आहे. भारताचे सलामीचे फलंदाज कर्णधार रोहित शर्मा आणि फॉर्ममध्ये असलेला युवा शुभमन गिल हे दोघेही संघाला चांगली सलामी देऊ शकतात. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर येणारा चेतेश्वर पुजारा हा इंग्लंडमध्येच होता त्याने कौंटी स्पर्धेत खोऱ्याने धावा काढल्या आहेत. चौथ्या क्रमांकावरील विराट कोहली तर जगातील सर्वोत्तम फलंदाज असून तो तुफान फॉर्ममध्ये आहे, त्यानंतर अनुभवी अजिंक्य रहाणे येईल तो देखील फॉर्ममध्ये आहे. यष्टीरक्षक म्हणून के एस भरत आणि ईशान किशन यापैकी कोणाची वर्णी लागेल, हे पहावे लागेल. मात्र कोणाचीही वर्णी लागली तरी ते देशासाठी सर्वोत्तमच कामगिरी करतील.
 
गोलंदाजांमध्ये मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि उमेश यादव ही तिकडी ऑस्ट्रेलियन फलंदाजांची दांडी गुल करेल तर फिरकीची जबाबदारी अनुभवी रवींद्र जडेजा पार पाडेल. उर्वरित एका जागेवर अनुभवी ऑफ स्पिनर रवीचंद्रन अश्विन आणि अष्टपैलू शार्दूल ठाकूर यापैकी कोणाची वर्णी लावायची याचा निर्णय संघ व्यवस्थापन खेळपट्टी पाहून घेतील. एकूणच या अंतिम कसोटीसाठी भारताचा संघ परिपूर्ण असून प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून खेळ केला आणि मागील वर्षी झालेल्या चुका टाळल्या, तर भारत कसोटीत अजिंक्य ठरू शकतो.
 
भारताच्या विरोधात जाणाऱ्या दोनच गोष्टी आहेत. त्यातील एक म्हणजे ही कसोटी इंग्लंडमध्ये आहे. त्यातही ओव्हलवर जिथे भारताचा रेकॉर्ड चांगला नाही. तिथे सध्या थंड हवामान आहे. भारताच्या उष्ण हवामानातून एकदम थंड हवामानात स्वतःला ॲडजस्ट करणे खेळाडूंसाठी मोठे आव्हान असेल. अर्थात भारताचे सर्व खेळाडू अनुभवी असून जवळपास सर्वच खेळाडूंना इंग्लंडमध्ये खेळण्याचा अनुभव आहे. त्यामुळे त्यांनी जर आपल्या क्षमतेनुसार खेळ केला, तर इंग्लंडमध्येही भारतीय खेळाडू आपल्या गुणवत्तेचा डंका पिटतील.
 
भारताच्या दृष्टीने दुसरी महत्वाची समस्या ही आहे की, या संघातील पुजारा वगळता इतर सर्व खेळाडू आयपीएलमध्ये खेळत होते. जवळपास दोन महिने हे खेळाडू २० षटकांच्या मर्यादित क्रिकेटमध्ये खेळत होते. आता त्यांना थेट ५ दिवसांच्या कसोटीत खेळायचे आहे. टी २० सारख्या छोट्या फॉरमॅटमधून थेट कसोटी सारख्या मोठ्या फॉरमॅटमध्ये खेळणे हे देखील संघासाठी मोठे आव्हान असेल अर्थात भारताचे सर्व खेळाडू हे व्यावसायिक आहेत त्यामुळे ते या समस्येवर देखील मात करून भारतच टेस्ट मध्ये बेस्ट आहेत हे जगाला दाखवून देतील. संघातील सर्व खेळाडूंनी आपल्या क्षमतेनुसार खेळ केला तर भारतच टेस्ट मध्ये बेस्ट आहे हे सिद्ध होईल. भारतीय संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (wtc) च्या अंतिम सामन्यासाठी मनापासून शुभेच्छा!
 
श्याम बसप्पा ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५
 
*Disclaimer : ब्लॉग हे स्वतंत्र व्यासपीठ आहे. त्यामुळे यात मांडले गेलेले विचार हे लेखकाचे आहेत.