राष्ट्रपती मुर्मू सुरीनामचा सर्वोच्च नागरी पुरस्कार 'ग्रँड ऑर्डर ऑफ द चेन ऑफ द यलो स्टार'ने सन्मानित

    06-Jun-2023
Total Views |

Draupadi Murmu - Abhijeet Bharat
 
पारमारिबो : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आज सुरीनामचा सर्वोच्च नागरी पुरस्कार 'ग्रँड ऑर्डर ऑफ द चेन ऑफ द यलो स्टार'ने सन्मानित करण्यात आले. सुरीनामचे राष्ट्रपती चंद्रिका प्रसाद संतोखी यांनी मजबूत द्विपक्षीय संबंधांबद्दल राष्ट्रपती मुर्मू यांचा सत्कार केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही राष्ट्रपती मुर्मू यांचे अभिनंदन केले आहे. सूरीनामचा सर्वोच्च नागरी पुरस्कार - 'ग्रँड ऑर्डर ऑफ द चेन ऑफ द यलो स्टार'ने सन्मानित झाल्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे अभिनंदन. सुरीनामचे सरकार आणि तिथल्या लोकांचा हा विशेष स्नेहभाव उभय देशांमधील शाश्वत मैत्रीचेच प्रतीक आहे, असे पंतप्रथम मोदी यावेळी म्हणाले.
 
 
भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि सुरीनामचे राष्ट्रपती चंद्रिका प्रसाद संतोखी सोमवारी संध्याकाळी सुरीनाममध्ये भारतीयांचे आगमन झाल्याच्या घटनेला १५० वर्षं पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने पारमारिबो येथे झालेल्या सांस्कृतिक महोत्सवाचे साक्षीदार ठरले.
 
सुरीनाममध्ये भारतीयांचे आगमन झाल्याच्या घटनेला १५० वर्षं पूर्ण झाल्याचा सोहळा आज आपण साजरा करत असून सुरीनामच्या इतिहासातील हा एक महत्वपूर्ण टप्पा आहे, असे पॅरामारिबो येथील इंडिपेंडन्स स्क्वेअर येथे झालेल्या मेळाव्याला संबोधित करताना राष्ट्रपती म्हणाल्या. 1873 मध्ये आजच्याच दिवशी भारतीयांचा पहिला गट लल्ला रुख याजहाजावरून सुरिनामच्या किनाऱ्यावर दाखल झाला आणि या देशाच्या इतिहासातील एका नवीन अध्यायाला आरंभ झाला.
 
दोन्ही राष्ट्रांमध्ये असलेले भौगोलिक दृष्टया प्रचंड अंतर, भिन्न वेळ क्षेत्रे आणि सांस्कृतिक विविधता असून देखील भारतीय समुदाय आपल्या मुळांशी नेहमीच जोडलेला राहिल्याबद्दल आनंद वाटत असल्याचे राष्ट्रपती म्हणाल्या. भारतीय प्रदेशातून सुरीनाममध्ये गेलेल्या मूळ भारतीय स्थलांतरित व्यक्तींच्या चौथ्या पिढीपासून ते सहाव्या पिढीपर्यंतच्या व्यक्तींना प्रवासी भारतीय (ओसीआय) कार्डसाठी पात्रता निकष वाढवण्याचा भारत सरकारचा निर्णय राष्ट्रपतींनी जाहीर केला. सुरीनामच्या भारताशी असलेल्या दीडशे वर्षं जुन्या नातेसंबंधात ओसीआय कार्ड हे महत्वाचा दुवा म्हणून पहिले जाऊ शकते, असे त्यांनी सांगितले.
 
यावेळी सुरिनाममधे पहिल्यांदा पाऊल ठेवलेल्या भारतीय पुरुष आणि स्त्रीचे प्रतिक असलेल्या बाबा आणि माई यांच्या स्मारकावर राष्ट्रपतींनी आदल्या दिवशी, आदरांजली वाहिली.
 
राष्ट्रपती भवनात झालेल्या एका समारंभात सुरीनामच्या राष्ट्रपतींनी ‘ग्रँड ऑर्डर ऑफ द चेन ऑफ द यलो स्टार’ हा सुरीनामचा सर्वोच्च नागरी सन्मान राष्ट्रपती मुर्मू यांना प्रदान केला. राष्ट्रपती मुर्मू यांनी पुरस्कार स्विकारल्यानंतर या सन्मानाबद्दल राष्ट्रपती संतोखी आणि सुरीनाम सरकारचे आभार मानले. हा सन्मान केवळ त्यांच्यासाठीच नव्हे तर भारतातील १.४ अब्जाहून अधिक लोकांसाठीही खूप महत्त्वाचा आहे, असे त्या म्हणाल्या. उभय देशांमधील बंधुत्वाचे संबंध समृद्ध करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या भारतीय-सूरीनामी समुदायाच्या पिढ्यांना त्यांनी हा सन्मान समर्पित केला.