रक्तगटाचा अपत्यप्राप्तीशी संबंध नाही; जस्ट 'बी पॉझिटीव्ह'

    05-Jun-2023
Total Views |
  • 'ती' ने उलगडले स्त्रियांचे भावविश्व
Helath news - Abhijeet Bharat
 
नागपूर : लग्न करताना जन्मकुंडलीसोबत मेडिकल कुंडली देखील बघावी. रक्तगटाचा अपत्यप्राप्तीशी काहीही संबंध नसून, समाजाने 'बी पॉझिटीव्ह' (सकारात्मकता) रहावे. रक्तगटाऐवजी 'पती-पत्नीच्या' मानसिक आणि शारीरिक आरोग्याच्या निकषांचा विचार करावा, असे मत सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ. चैतन्य शेंबेकर यांनी मांडले. मुलींचे लग्नाचे वय 25-28 असावे आणि वय वर्षे 30 च्या आत पहिले मूल व्हायलाच हवे. मुलींची वयाची तिशी उलटली की अंडाशयाचे वय वाढत जाते, ज्यामुळे अपत्यप्राप्तीमध्ये अडचणी येतात, अशी माहिती त्यांनी दिली.
 
ओम चॅरिटेबल ट्रस्ट आणि ओमेगा हॉस्पिटल प्राय. लिमिटेड यांच्या सौजन्याने ऋतुराज प्रस्तुत 'ती' हा स्त्रियांच्या आयुष्यावरील संगीतमय कार्यक्रम रविवारी लक्ष्मीनगर येथील सायंटिफिक सभागृहात संपन्न झाला. संगीत व चर्चा असे स्वरूप असलेल्या या विशेष उपक्रमातून प्रतिथयश स्त्रीरोग तज्ञ डॉ. चैतन्य शेंबेकर आणि एनेस्थेटिस्ट डॉ. मनीषा शेंबेकर यांनी स्त्रियांच्या दैनंदिन आयुष्यातील समस्या, त्यांचे मानसिक व शारीरिक आरोग्य, रजोनिवृत्ती, वंध्यत्व यावर मार्गदर्शन केले.
 
निवेदक किशोर गलांडे यांनी त्यांना बोलते केले. मुग्धा तापस यांच्या संकल्पनेतून कार्यक्रमास मूर्त स्वरूप आले. सुप्रसिद्ध गायिका मंजिरी वैद्य अय्यर व गुणवंत घटवाई यांनी सादर केलेल्या 'अपार हा भवसागर दुस्तर, तुझ्या कृपेविण कोण तरे' या गीतगायनाने स्त्रीशक्तीला मानवंदना देत कार्यक्रमाची सुरुवात झाली. तर 'गंध फुलांचा गेला सांगून' या गीतातून त्यांनी 'स्त्री-पुरुष' मिलन आणि दांपत्यजीवन वाटचालीच्या भावविश्वाचे नाजूक क्षण उलगडले. तसेच श्रेया खराबे टांकसाले यांनी गायलेल्या 'आज मैं उपर जमाना है नीचे' या गाण्याने अपत्यप्राप्तीनंतर स्त्रियांच्या आयुष्यात येणाऱ्या मातृत्वभावनेला स्पर्श केला.
 
आजकाल लग्न होऊन 5-5 वर्षे उलटली तरी मातृत्वाबाबत स्पष्टता नसल्याचे दिसून येते. वंध्यत्वाची व्याख्या हीच आहे की, लग्नाच्या 6 महिने वा 2-4 वर्षात मूल झाले नाही तर डॉक्टरांना भेटावे. वेळेत उपचार न झाल्यास याचा स्त्री आणि पुरुष दोघांच्याही मानसिक आरोग्यावर परिणाम होतो, अशी माहिती डॉ. चैतन्य यांनी यावेळी उपस्थितांना दिली. स्त्रियांमधील सहनशक्ती कमी झाली असून अर्भकाचे वजन, मातांचे वजन वाढले आहे. ज्यामुळे सिझेरियनचे प्रमाण वाढले असल्याचेही ते म्हणाले.
 
पॉर्न या विषयाला देखील त्यांनी यावेळी हात घातला. पुरुषांमध्ये सेक्स ड्राइव्ह कमी होण्यास, कालांतराने वंध्यत्व येण्यास ही सुद्धा गोष्ट घातक ठरत असल्याचे मत त्यांनी मांडले. बदलती जीवनशैली, प्रदूषण, पिढीजात आजार यामुळे प्रजननक्षमतेचे प्रमाण घटत असून योग्य आहार, दैनंदिन व्यायाम, समतोल जीवनशैलीतून आरोग्य अबाधित राखावे असे ते यावेळी म्हणाले. स्त्रियांनी आपल्या आरोग्याविषयी जाणून घ्यावे, आपल्या आयुष्यातील घटना जसे की गर्भपात, मानसिक स्थिती, वय याबाबत डॉक्टरांना अनभिज्ञ ठेवू नये, असे मार्गदर्शन मनीषा यांनी केले. यावेळी त्यांनी सोशल एग फ्रिजिंग, आयव्हीएफ, मासिक पाळी या नाजूक विषयाबाबत देखील जागृती केली. स्त्री व पुरुष दोघांनीही लग्नपूर्व, मातृत्वपूर्व समुपदेशन करावे, असेही त्या म्हणाल्या. 25 वर्षांपासून ओमेगा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही नागपूरकरांच्या सेवेत असून कर्करोग निदान, फ्री सोनोग्राफी सारख्या सुविधा आम्ही स्त्रियांना मोफत देतो. यासह नॉर्मल व सिझेरियन दोन्ही प्रसुतीचे दर आम्ही समान ठेवले असल्याची माहिती त्यांनी दिली.
 
कार्यक्रमादरम्यान गुणवंत घटवई, मंजिरी वैद्य अय्यर, श्रेया खराबे टांकसाळे यांनी गायलेल्या 'नया कोई गिल खिलेगा', 'उगा का काळीज माझे', 'ऋतू हिरवा', 'मेरे महबूब मे क्या नही' सारख्या विषयाशी संबंधित विविध गाण्यांनी स्त्रियांचे भावविश्व व आयुष्यातील स्थित्यंतरे यावर प्रकाश टाकत कार्यक्रमाला बहार आणली. त्यांना परिमल जोशी, गौरव टांकसाळे, मोरेश्वर दहासहस्त्र, विशाल दहासहस्त्र व मुग्धा तापस यांनी साथसंगत केली.
 
या अनोख्या संगीतमैफिलीला नागपूरकरांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमाने सर्जन आणि सृजन दोहोंचे स्वरूप असलेल्या स्त्रीशक्तीचा नागपूरकरांमध्ये जागर केला. आपल्या संस्कृतीने कायमच स्त्री जीवनाचा विचार केला असून खरोखरच ती आपल्याला परिचित व्हावी म्हणून या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती निवेदक किशोर गलांडे यांनी दिली. ऋतुराज संस्थेचे अध्यक्ष गुणवंत घटवई यांनी डॉ. चैतन्य व मनीषा यांचा आदरपूर्वक सत्कार केला.