बांग्लादेशच्या दोन दिवसीय दौऱ्यासाठी लष्करप्रमुख रवाना

05 Jun 2023 17:28:37
 
Bangladesh News - Abhijeet Bharat 
ढाका : लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे सध्या दोन दिवसांच्या बांग्लादेश दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. 5 ते 6 जून असा त्यांचा हा दौरा असणार आहे. या भेटीदरम्यान लष्करप्रमुख बांग्लादेशच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांची भेट घेतली. या भेटीत ते भारत-बांग्लादेश संरक्षण संबंधाना चालना देणाऱ्या इतर मार्गांविषयी चर्चा करतील.
 
 
6 जून रोजी लष्करप्रमुख चत्तग्राम येथे बांग्लादेश लष्करी अकादमीच्या (बीएमए) 84 व्या दीक्षांत संचलनाची पाहणी करतील. या संचलनादरम्यान ते बीएमएचा दीक्षांत अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या सर्वोत्तम परदेशी छात्राच्या (परदेशी मित्र देशांमधील) सन्मानासाठी स्थापित करण्यात आलेली ‘बांगलादेश भारत मैत्री ट्रॉफी’ प्रदान करतील. यावर्षी पहिली ट्रॉफी टांझानियाचे अधिकारी छात्र एव्हर्टन यांना प्रदान करण्यात येणार आहे. डिसेंबर 2021 मध्ये डेहराडूनच्या भारतीय लष्करी अकादमीमध्ये (आयएमए) स्थापित केलेली ‘बांग्लादेश ट्रॉफी आणि पदक’ यांची परतफेड म्हणून ही ट्रॉफी दिली जाणार आहे.
 
विशेष बाब म्हणजे लष्करप्रमुख आयएमए मध्ये 10 जून 2023 रोजी आयएमच्या दीक्षांत संचलनाची पाहणी करणार आहेत आणि त्यावेळी बांग्लादेश पदक आणि ट्रॉफी प्रदान करणार आहेत. या कार्यक्रमाव्यतिरिक्त लष्करप्रमुख द्विपक्षीय सहकार्याच्या मुद्यांवर बांग्ला देशच्या वरिष्ठ सहकारी अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याव्यतिरिक्त, बांग्लादेशचे लष्करप्रमुख आणि सशस्त्र दल विभागाचे प्रधान कर्मचारी अधिकारी यांची भेट घेणार आहेत.
Powered By Sangraha 9.0