भारत आणि युरोपीय देशांत व्यापारासोबतच प्रेम आणि स्नेह देखील घट्ट व्हावा - सुधीर मुनगंटीवार

    04-Jun-2023
Total Views |

Sudhir Mungantiwar - Abhijeet Bharat
 
मुंबई : भारत आणि युरोपीय देशातील सांस्कृतिक संबंध, व्यापार-उद्योगाला प्रोत्साहन देत असतानाच 'इन्वेन्शन आणि इनोवेशन' चा प्राधान्याने विचार करावा व वसुंधरेच्या रक्षणासाठी पर्यावरण संवर्धनाचे कार्य वाढावे; यासाठी महाराष्ट्र सतत सोबत राहील, दोन्ही देशांत व्यापार वाढावा पण प्रेम व स्नेह देखील घट्ट व्हावा, अशी अपेक्षा वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir mungantiwar) यांनी व्यक्त केली.
 
 
 
'द कौन्सिल ऑफ युरोपीयन चेंबर इन इंडिया' च्या वतीने मुंबईतील ताज हॉटेल येथे आयोजित 'युरोपियन डे' समारंभात ते बोलत होते. मंचावर मध्य प्रदेशचे सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योग तथा विज्ञान व तंत्र विज्ञान मंत्री श्री ओमप्रकाश सकलेचा, स्वीडन च्या कौन्सिल जनरल ॲना लेकवॉल, द कौन्सिल ऑफ युरोपीयन चेंबर इन इंडियाच्या डायरेक्टर डॉ. रेणू शोम, अध्यक्ष पियुष कौशिक, उपाध्यक्ष राजीव शर्मा उपस्थित होते.
 
मंत्री मुनगंटीवार पुढे म्हणाले की, भारत आणि युरोपीय देशांचे संबंध व्यापारिक आणि आर्थिक क्षेत्रात अधिक दृढ व्हायला हवे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत जागतिक स्तरावर प्रगती करीत आहे. 'वसुधैव कुटुंबकम' ही भावना आणि हे विचार जगात पोहोचावे यासाठी पंतप्रधान मोदी यांनी पुढाकार घेतला आहे. जय जवान, जय किसान, जय विज्ञान च्या पुढे 'जय अनुसंधान' चा नारा देत नवीनतम आणि संशोधन (इनोवेशन आणि इन्वेन्शन) याकडे आता भारत लक्ष देत आहे. आपणही यासाठी पुढे यावे; फक्त संशोधन करताना नव्या समस्या निर्माण होऊ नयेत याची काळजी घेतली पाहिजे असेही ते म्हणाले.
 
जागतिक पर्यावरण बदलाचा प्रश्न संपूर्ण जगाला सतावत असून पर्यावरण व वन संरक्षण ही आपण आपली जबाबदारी समजून 'ग्लोबल वॉर्मिंग' नावाच्या दानवाचा संहार करु, अशी भावना मंत्री मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.
 
भारतात गुंतवणूक करण्याचे आवाहन उपस्थितांना करुन मंत्री मुनगंटीवार म्हणाले, तुम्ही विविध क्षेत्रात गुंतवणूक करण्यास पुढे या. महाराष्ट्र स्वागताला तयार आहे, यावेळी त्यांनी उपस्थित सर्व देशांच्या अधिकाऱ्यांना व उद्योगपतींना ताडोबा व्याघ्र सफारीला येण्याचे निमंत्रण देखील दिले.
 
मध्य प्रदेशचे मंत्री ओमप्रकाश सकलेचा यांनी भारत आणि युरोपीय देशांनी आपल्या गरजा ओळखून शैक्षणिक, औद्योगिक आणि विशेष करुन तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात देवाण घेवाण करावी अशी अपेक्षा व्यक्त केली.