पंतप्रधान मोदी करणार पहिल्या राष्ट्रीय प्रशिक्षण परिषदेचे उद्घाटन

    10-Jun-2023
Total Views |
  • परिषदेत देशभरातील नागरी सेवा प्रशिक्षण संस्थांचे प्रतिनिधी होणार सहभागी
Pm Modi - Abhijeet Bharat 
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते नवी दिल्ली येथील प्रगती मैदानावरील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि अधिवेशन केंद्रात 11 जून 2023 रोजी सकाळी 10:30 वाजता पहिल्या-वहिल्या राष्ट्रीय प्रशिक्षण परिषदेचे उद्घाटन होणार आहे. यावेळी पंतप्रधान उपस्थितांना संबोधितही करणार आहेत.
 
नागरी सेवेची क्षमता वाढवून देशातील प्रशासन प्रक्रिया आणि धोरण अंमलबजावणी सुधारण्यावर पंतप्रधानांचा भर आहे. या दृष्टीकोनातून मार्गदर्शन करून, योग्य वृत्ती, कौशल्ये आणि ज्ञानासह भविष्यासाठी सुसज्ज नागरी सेवांची तयारी करण्यासाठी राष्ट्रीय नागरी सेवा क्षमता विकास कार्यक्रम (NPCSCB) - ‘मिशन कर्मयोगी’ ची सुरुवात करण्यात आली. ही परिषद या दिशेने आणखी एक पाऊल आहे. नागरी सेवा प्रशिक्षण संस्थांमध्ये सहकार्य वाढवणे आणि देशभरातील नागरी कर्मचारी-अधिकारी यांच्यासाठी प्रशिक्षण पायाभूत सुविधा मजबूत करण्याच्या उद्देशाने, क्षमता निर्माण आयोगाद्वारे (NPCSCB) राष्ट्रीय प्रशिक्षण परिषद आयोजित करण्यात येत आहे.
 
केंद्रीय प्रशिक्षण संस्था, राज्य प्रशासकीय प्रशिक्षण संस्था, प्रादेशिक आणि क्षेत्रीय प्रशिक्षण संस्था तसेच संशोधन संस्थांसह प्रशिक्षण संस्थांचे 1500 हून अधिक प्रतिनिधी या संमेलनात सहभागी होतील. केंद्र सरकारचे विविध विभाग, राज्य सरकारे, स्थानिक स्वराज्य संस्थांतील नागरी कर्मचारी-अधिकारी तसेच खाजगी क्षेत्रातील तज्ञ या चर्चेत भाग घेतील.
 
विविध क्षेत्रातील लोक एकत्र आल्याने विचारांच्या देवाणघेवाणीला चालना मिळेल, भेडसावणारी आव्हाने आणि उपलब्ध संधी ओळखता येतील, क्षमता वाढीसाठी कृती करण्यायोग्य उपाय आणि सर्वसमावेशक धोरणे तयार करता येतील. या परिषदेत आठ चर्चासत्रे होतील. यात प्रत्येक नागरी सेवा प्रशिक्षण संस्थांशी संबंधित महत्त्वाच्या समस्यांवर लक्ष केंद्रीत केले जाईल. प्रशिक्षक विकास, प्रशिक्षण प्रभाव मूल्यांकन आणि सामग्री डिजिटलीकरण आदींचा समावेश आहे.