'चेन्नई'च सुपरकिंग!

    01-Jun-2023
Total Views |

CSK - Abhijeet  Bharat 
इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलच्या सोळाव्या हंगामाची नुकतीच सांगता झाली. सोमवारी झालेल्या रोमहर्षक अंतिम सामन्यात महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपरकिंगने हार्दिक पांड्याच्या गुजरात टायटनला शेवटच्या चेंडूवर नमवत पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरले. अंतिम सामन्यात पोहचलेले दोन्ही संघ हे तुल्यबळ होते कारण दोघांनीही साखळी सामन्यात चांगली कामगिरी करून पॉईंट टेबलवर पहिले आणि दुसरे स्थान पटकावले होते त्यामुळे अंतिम सामना रंगतदार होणार यात कोणालाही शंका नव्हती. वास्तविक हा सामना रविवारीच होणार होता मात्र पावसामुळे हा सामना सोमवारी खेळवण्यात आला. पहिली फलंदाजी करताना गुजरातने अपेक्षेप्रमाणे चांगली फलंदाजी करत दोनशेचा आकडा पार केला. त्यांच्या शुभमन गिल, साई सुदर्शन, कर्णधार हार्दिक पांड्या यांनी चांगली फलंदाजी करून संघाची धावसंख्या २१४ वर पोहचवली.
 
२१५धावांचे लक्ष घेऊन मैदानात उतरलेल्या चेन्नई संघासाठी हे मोठे आव्हान होते कारण त्यांच्या संघात जडेजा वगळता एकही मोठा सुपरस्टार नव्हता की आंतरराष्ट्रीय स्तरावर दबदबा निर्माण करणारा फलंदाज नव्हता मात्र त्यांच्याकडे होता धोनी हो तोच धोनी. त्याने आपल्या खेळाडूंमध्ये आत्मविश्वास निर्माण केला आणि खेळाडूंनीही त्याने टाकलेला विश्वास सार्थ ठरवला. सलामीच्या ऋतुराज गायकवाड आणि व्डेन कॉन्व्हे यांनी तडाखेबंद खेळी केली त्यानंतर आलेल्या सर्व फलंदाजांनी आपली जबाबदारी पार पाडली. सामना रंगतदार अवस्थेत पोहचला. शेवटच्या दोन चेंडूवर दहा धावांची आवश्यकता असताना जडेजाने मोहित शर्माला षटकार ठोकला आणि शेवटच्या चेंडूवर चौकार ठोकत आपल्या संघाला विजयी केले आणि संघातील खेळाडूंसह चाहत्यांना जल्लोष करण्याची संधी निर्माण करून दिली. या विजयासह चेन्नईने पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकत मुंबईची बरोबरी केली.
 
या विजयाचे जितके श्रेय या संघातील खेळाडूंना जाते तितके किंबहुना त्याहून अधिक श्रेय धोनीला जाते कारण या विजयामागचा खरा चेहरा जर कोण असेल तर तो धोनी आहे. धोनीला जगातील सर्वोत्कृष्ट कर्णधार का म्हटले जाते हे त्याने या आयपीएलमध्ये पुन्हा एकदा दाखवून दिले. वास्तविक या वेळच्या चेन्नई संघात दादा म्हणावा असा एकही खेळाडू नव्हता. धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला होता. जडेजा वगळता एकही आंतरराष्ट्रीय स्टार खेळाडू या संघात नव्हता. अगदी नवोदित आणि आंतरराष्ट्रीय करियर संपलेल्या खेळाडूंचा हा संघ होता पण म्हणतात ना परिसच्या स्पर्शाने सोने होते तसे या खेळाडूंचे झाले. या संघातही तसा परिस होता तो म्हणजे धोनी. धोनीने संघातील प्रत्येक खेळाडूला त्याची जबाबदारी समाजवून सांगितली आणि त्यांच्याकडून अपेक्षित ती कामगिरी करून घेतली. ऋतुराज गायकवाड आणि कॉन्व्हे हे दोघेही नवखे आहेत.
 
शिवम दुबेही तसा नवखाच आहे या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अजून अनुभव नाही तर अजिंक्य राहणेच टी२० ची करियर संपल्यातच जमा होती लिलावात त्याला कोणीही विकत घेतले नव्हते तीच गत अंबाती रायडूची होती. रायडूही त्याची शेवटची आयपीएल खेळत होता तर गोलंदाजांमध्ये तुषार देशपांडे, पथरीना, तक्षिणा या खेळाडूंची नावेही कोणाला माहीत नव्हते मात्र हे खेळाडू धोनीच्या संघात आले आणि धोनीने या खेळाडूंमधील गुणवता हेरली आणि त्यांच्या गुणवत्तेला पैलू पाडून त्यांच्याकडून अपेक्षित कामगिरी करून घेतली आणि आपल्या संघाला विजयी केले. धोनीच्या परिस स्पर्शामुळे या खेळाडूंचे सोने झाले आणि हा संघ विजयी झाला. धोनीने चेन्नईच सुपरकिंग असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले. विजयी चेन्नई संघाचे मनापासून अभिनंदन!
 
श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५