परदेशात व्‍यवसायाच्‍या संधी उपलब्‍ध करून देण्‍यासाठी भारतीय दूतावास उत्सुक

    22-May-2023
Total Views |
- माजी राष्ट्रदूत अनिल त्रिगुणायत यांचे प्रतिपादन
- व्हीएमएचा संवाद उपक्रम

Former Ambassador Anil Trigunayat 
 
नागपूर :
परदेशात प्रवास करणाऱ्यांसाठी व्हिसा आणि संबंधित कागदपत्रे देण्यापुरती मर्यादित असलेली केंद्रे म्हणून त्यांच्या पूर्वीच्या ओळखीपासून भारतीय दूतावासांनी बराच पल्ला गाठला आहे. भारतीय दूतावास आता राष्ट्रीय सीमाओलांडून व्यावसायिक हितसंबंध जोपासणाऱ्यांसाठी सुविधा केंद्र मानले जातात, असे मत माजी राजदूत अनिल त्रिगुणायत यांनी व्यक्त केले. विदर्भ मॅनेजमेंट असोसिएशनतर्फे रविवारी चिटणवीस सेंटरच्या सभागृहात आयोजित संवाद उपक्रमात ते बोलत होते. जॉर्डन, लिबियासह अन्य देशांमध्ये सेवा देणारे त्रिगुणायत यांनी ‘उद्योन्मुख अर्थव्यवस्थेत व्यावसायिक संधींचा शोध’ विषयावर त्यांनी विचार मांडले.
 
ते म्हणाले, नव्या तंत्रज्ञाशी कसे जोडता येईल, त्याबाबत सहकार्य करणे, देशांमधील व्यवसायाला चालना देणे, अधिकाधिक विदेशी गुंतवणूक देशात आणण्यावर दूतावासांचा भर आहे. कामाचाच भाग म्हणून प्रत्येक ॲम्बसीकडे स्थानिक उद्योगांची, तिथे असणाऱ्या व्यावसायिक संधींची संपूर्ण माहिती उपलब्ध असते. दूतावासांच्या संकेतस्थळांवर ही माहिती उपलब्ध असून अधिक माहिती आता सहजतेने मागवून घेता येते. इथल्या व्यावसायिकांच्या दृष्टीने व्यवसाय विस्तारण्यासाठी ही माहिती उपयुक्त सिद्ध होते आहे. इंटरनेटवर आताशा अनेक प्रकारची माहिती उपलब्ध असते पण बरेचदा ही माहिती चुकीची असते. त्यांच्यावर अवलंबून राहू नका, निर्यात पोर्टलसह शासकीय संकेतस्थळावरूनच माहिती घेणे, योग्य ठरेल, असा सल्ला त्यांनी दिला.
 
सद्यस्थितीत आपल्या जीडीपी पैकी ६० टक्के वाटा सेवा क्षेत्राचा, १५ टक्के मॅनिफॅक्चरिंग आणि उर्वरित १५ टक्के वाटा कृषी निर्यातिचा आहे. आयात निर्यातीतील ९५ टक्के प्रकरणी वर्ल्ड ट्रेट ऑर्गनायजेशनद्वारे (डब्ल्यूटीओ) नियंत्रित केले जातात.
 
जागतिक पटलावरील एकूण व्यापारात आपण केवळ ३ टक्केच आहोत. म्हणजेच अजुनही लक्षणीय वाढीची फार मोठी संधी आपल्याकडे आहे. रशिया- युक्रेन युद्धामुळे ४ एफ अर्थात फायनास (वित्त), फूड (अन्न), फ्युल (इंधन), फरटीलायझर (खत) या बाबींच्या उपलब्धतेवर परिणाम झाला आहे. अशा स्थितीतही आज अमेरिकेचा डॉलर सर्वात प्रभावी आहे. अनेक देशांना ते परवडणारे नाही. यामुळे आपल्या चलनात व्यवसायावर (मुक्त व्यापार) भर दिला जातो आहे. ब्रिक्स, जी-२० राष्ट्र डी-डॉलरायझेशनवर भर देत आहेत. या बदलणाऱ्या अर्थकारणात आपल्याला जागतिक पटलावर व्यावसायिक प्रगती साधण्याची मोठी संधी उपलब्ध असल्याचे ते म्हणाले. यावेळी उपस्थित्यांच्या शंकाचे त्यांनी निरसन केले. यावेळी वार्षिकांक 'विजडम फाउंटन' चे अनिल त्रिगुणायत यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
 
व्हीएमएची सामंजस्य करारावर स्वाक्षरी
व्हीएमएने आंतरराष्ट्रीय व्यवसायांच्या विकासासाठी सहकार्यासाठी एमआयआयसीसीआयएबरोबर सामंजस्य करार केला असून त्‍यावर व्‍हीएमएचे अध्‍यक्ष सौरभ मोहता व अनिल त्रिगुणायत यांनी स्वाक्षरी केली. यासंदर्भात विविध विषयांवर चर्चासत्रांचे आयोजन करून त्‍यासाठी परदेशी शिष्‍टमंडळाला आमंत्रित केले जाणार आहे. या करारामुळे विदर्भातील उद्योजकांना परदेशात आपला ठसा उमटविण्यास मदत होणार आहे.