सामाजिक कार्यकर्त्यांचा पुढाकार! संविधान उद्देशिका आता आदिम माडिया भाषेत

    08-Apr-2023
Total Views |

indian constitution preamble - Abhijeet Bharat
 
गडचिरोली : जिल्ह्यातील नक्षलग्रस्त अतिदुर्गम भामरागड, एटापल्ली, अहेरी, धानोरा व छत्तीसगड सीमावर्ती भागात आदिम माडिया समाज आहे. मागील वर्षी पाथ संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात ९४ टक्के माडिया समाज बांधवांनी 'संविधान' हा शब्दच ऐकला नसल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले होते. ही बाब लक्षात घेता भामरागड येथील माडिया समाजातील पहिले वकील ॲड. लालसू नोगोटी, हेमलकसा येथील चिन्ना महाका व चंद्रपूर येथील अविनाश पोईनकर या सामाजिक कार्यकर्त्यांनी भारतीय संविधान उद्देशिकेचा स्थानिक आदिम माडिया भाषेत अनुवाद केला आहे.
 
देशात एकूण ७५ आदिम समुदाय आहेत. त्यात महाराष्ट्रात कोलाम, कातकरी आणि माडिया या तीन आदिम जमाती आहे. राज्यातील एकूण ३ आदिम समुदायांपैकी जल, जंगल, जमिनीवर उपजीविका करणारा हा एक समुदाय आहे. शिक्षणाची कमी, जन्मदरापेक्षा मृत्यूदर अधिक या समाजात दिसते. स्वतंत्र बोलीभाषा व संस्कृती या समुदायाची ओळख आहे. स्वातंत्र्याच्या ७५ पंच्याहत्तरीनंतरही मुलभूत गरजांचीच पुर्तता अद्याप या परिसरात होवू शकलेली नाही. हक्क आणि अधिकाराची होणारी गळचेपी या समुदायासाठी नित्याचीच बाब झाली आहे. अशा या भागात भारतीय संविधान त्यांच्याच बोलीभाषेत पोहोचणे गरजेचे आहे. संविधान उद्देशिका म्हणजे संविधानाच्या प्रतीचा सार आहे. त्यामुळे या उद्देशिकेच्या माध्यमातून नक्षल प्रभावित भागात संविधानाबाबत जनजागृती करण्याचा एक सकारात्मक अन् प्रामाणिक प्रयत्न केला जातो आहे. माडिया समाजामध्ये या संविधान उद्देशिकेच्या माध्यमातून संविधानाबाबत जनजागृती निर्माण झाल्यास कालांतराने हक्काबाबत, देशाचे संविधान अवलंबण्याबाबत आमुलाग्र बदल होईल.
 
संविधान तळागाळात - घराघरांत पोहोचवणे प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. संविधानाचे पाईक म्हणून या भागात संविधान जनजागृतीचे प्रयत्न गरजेचे आहे. माडिया समाजाला आपल्या मातृभाषेत उद्देशिका कळावी अन् त्यातून जनजागृती करता यावी म्हणून आम्ही हा अनुवाद केला असल्याचे सामाजिक कार्यकर्ते ॲड. लालसू नोगोटी, चिन्ना महाका, अविनाश पोईनकर यांनी सांगितले.
 
अनुवादाबाबत प्रशासन अनभिज्ञ
 
संविधान म्हणजे काय, हे समजावून सांगण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यासह छत्तीसगडच्या दुर्गम भागामध्ये प्रशासन गेली अनेक दशके प्रयत्न करीत असले तरी आदिम माडिया भाषेतून ते नागरिकांपर्यंत पोहोचले नाही. संविधान उद्देशिकेचा आजवर अनेक भारतीय भाषांमध्ये अनुवाद झाला आहे. मात्र, आदीम अन् त्यातल्या त्यात नक्षल प्रभावित भागातील या माडिया भाषेत संविधान उद्देशिकेचा अनुवाद पहिल्यांदाच झाला असल्याने त्याला एक वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. प्रशासन या अनुवादाबाबत सध्या अनभिज्ञ असले तरी या राष्ट्रीय कार्याची दखल घेवून या दुर्गम परिसरात शाळा, महाविद्यालय, शासकिय-निमशासकिय कार्यालयातून माडिया भाषेतील संविधान उद्देशिका पोहोचवून जनजागर करणे आवश्यक आहे.
 
 
indian constitution preamble - Abhijeet Bharat