देहरादून :
केदारनाथनंतर आता भगवान बद्रीनाथ धामचे (Badrinath Dham) दरवाजेही भाविकांसाठी उघडण्यात आले आहे. वैदिक मंत्रोच्चार आणि संपूर्ण विधिवत पूजा अर्चना करून गुरुवारी सकाळी ७.१० वाजताच्या शुभ मुहूर्तावर बद्रीनाथ धामचे दरवाजे खुले करण्यात आले. या निमित्ताने मंदिराला तब्बल 15 क्विंटलपेक्षा अधिक फुलांनी सजवण्यात आले आहे. अशातच आज बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडल्यानंतर उत्तराखंडमध्ये भाविकांसाठी चार धामची यात्रा सुरू झाली आहे.
बद्रीनाथ येथे सध्या जोरदार बर्फवृष्टी सुरु आहे. असे असताना देखील जवळपास २० हजार भाविक बद्रीनाथ मंदिराचे दरवाचे उघडल्यानंतर प्रथम दर्शनासाठी तेथे उपस्थित होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही बद्रीनाथ धाममध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने पहिली पूजा आणि आरती करण्यात आली. आयटीबीपीच्या बँडशिवाय गढवाल स्काऊट्सनेही यावेळी सादरीकरण केले. दरवाजे उघडण्यापूर्वी शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद मंदिरात पोहोचले होते.
जेथे भगवान विष्णू 12 महिने वास्तव्य करतात, त्या विश्वाचे आठवे बैकुंठ धाम बद्रीनाथ म्हणून ओळखले जाते. असे मानले जाते की भगवान विष्णू येथे 6 महिने विश्रांती घेतात आणि 6 महिने भक्तांना दर्शन देतात. तर दुसरीकडे अशीही एक समजूत आहे की वर्षातील ६ महिने मानव भगवान विष्णूची पूजा करतात आणि उर्वरित ६ महिने येथे देवता विष्णूची पूजा करतात, ज्यामध्ये देवर्षी नारद हे स्वतः मुख्य पुजारी असतात.
यापूर्वी अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर शनिवारी २२ एप्रिल रोजी गंगोत्री आणि यमुनोत्री धामचे दरवाजे भाविकांसाठी खुले करण्यात आले. त्यानंतर २५ एप्रिल रोजी केदारनाथ धामचे दरवाजेही उघडले आहेत. यानंतर आज बद्रीनाथ धामचे दरवाजे भाविकांसाठी खुले झाल्यानंतर उत्तराखंडमध्ये चारधाम यात्रेला सुरुवात झाली आहे.