सहाव्या रोलबॉल आंतरराष्ट्रीय स्पर्धेत महिला गटात केनिया संघाला विजेतेपद

26 Apr 2023 15:14:48

6th International Rollball Championship


पुणे :
शिवछत्रपती क्रीडानगरी म्हाळुंगे बालेवाडी येथे आयोजित सहाव्या रोलबॉल आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या (6th International Rollball Championship) महिला गटातील सुवर्णपदक विजेत्या केनिया संघाला उच्च व तंत्रशिक्षण तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले.
 
यावेळी आमदार माधुरी मिसाळ, भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे उपाध्यक्ष अमिताभ शर्मा, भारतीय रोलबॉल संघटनेचे अध्यक्ष मनोहर कांत, आशियाई रोलबॉल संघटनेचे अध्यक्ष एस. एस. रॉय, भारतीय रोलबॉल संघटनेचे उपाध्यक्ष मनोज यादव, युगांडा रोलबॉल फेडरेशनच्या अध्यक्षा पेनिना काबेंगे, बेलारूस रोलबॉल संघटनेचे अध्यक्ष अलेक्सी खाटीलेव्ह, क्रीडा भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष राज चौधरी, महाराष्ट्र रोलबॉल संघटनेचे अध्यक्ष संदीप खर्डेकर, रोलबॉल क्रीडाप्रकाराचे जनक राजू दाभाडे, भारतीय रोलबॉल संघटनेचे सचिव चेतन भांडवलकर आदी उपस्थित होते.
 
राष्ट्रीय एकात्मतेचे साधन म्हणून देशात खेळाला प्रोत्साहन देण्यात येत आहे. त्याअंतर्गत रोलबॉल आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे २१ एप्रिलपासून पुण्यात आयोजन करण्यात आले आहे. राजू दाभाडे यांनी पुण्यात या खेळाचा प्रसार केला असून सुमारे ५० पेक्षा जास्त देशात हा खेळ खेळला जाणे विशेष असेच आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
 
भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे उपाध्यक्ष अमिताभ शर्मा म्हणाले, रोलबॉल आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशासोबत विदेशी खेळाडू सहभागी झाले आहेत. महाराष्ट्राने या स्पर्धेचे उत्तमपद्धतीने नियोजन करुन यशस्वीपणे आयोजन केले आहे. महाराष्ट्राने खेळाडूंना आवश्यक त्या सर्व सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. रोलबॉल खेळाला एशियन आणि कॉमनवेल्थ स्पर्धेत समावेश करण्यासाठी संघटना प्रयत्नशील आहे, असेही शर्मा म्हणाले.
 
भारतीय संघाला कांस्यपदक
या स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीमध्ये इजिप्त संघाने भारताला ४-३ फरकाने पराभूत करुन अंतिम फेरी गाठली. अंतिम लढतीत केनिया संघाने इजिप्त संघाचा ५-० फरकाने पराभव करुन विजेतेपद पटकावले. केनिया संघाने सुवर्णपदक, इजिप्त रौप्यपदक आणि भारताच्या संघाने कांस्यपदक पटकावले.
 
 
Powered By Sangraha 9.0